Israel Iran War – पुतिन यांच्याकडून युरोपच्या वर्मावर बोट; एका निर्णयाने जगभरात महागाईचा आगडोंब उसळणार
अमेरिका, इस्रायल- इराण युद्धाने जगभरात तणवाचे वातावरण आहे. तसेच या युद्धाचा परिणाम म्हणून जगावर गंभीर ऊर्जा संकटाचे सावट आहे. या जागतिक तणावादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केल्याने युरोपीय देशांची चिंता वाढली आहे. रशिया लवकरच युरोपला होणारा गॅस पुरवठा पूर्णपणे थांबवू शकतो, असे पुतिन यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे. त्यांच्या केवळ विधानामुळे युरोपीय बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे, ज्यामुळे गॅसच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. या यद्धाच्या आगीत पुतिन यांनी तेल ओतले आहे. त्यांच्या या विधानाने जगभरात मोठ्या प्रमाणात महागाई वाढणार आहे.
युद्धादरम्यान रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युरोपच्या समस्या वाढवल्या आहेत. पुतिन यांनी युरोपला होणारा गॅस पुरवठा बंद करण्याचे संकेत दिले आहेत. या विधानामुळे गॅसच्या किमती ५०% ने वाढल्या आहेत. कतारमधून होणारा पुरवठाही थांबवण्यात आला आहे, ज्यामुळे युरोप गंभीर महागाई आणि ऊर्जा संकटाच्या उंबरठ्यावर आहे. पुतिन यांनी जाहीरपणे सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता, युरोपीय बाजारपेठांना होणारा गॅस पुरवठा थांबवण्याची वेळ येऊ शकते. राजनैतिक भाषेचा कौशल्याने वापर करून यावर फफ्त विचार सुरु असल्याचे सांगत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले.
पुतिन यांचा असा युक्तिवाद केला आहे की, युरोप रशियावर सतत नवीन निर्बंध लादण्याची योजना आखत आहे, तर रशियाकडे आता त्यांचा गॅस विकण्यासाठी नवीन आणि मोठ्या बाजारपेठा आहेत. युद्धामुळे जागतिक तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा वेळी पुतिन यांचे विधान म्हणजे युरोपच्या वर्मावर बोट ठेवण्यासारखे आहे.
युरोपमध्ये गॅसच्या किमती गगनाला भिडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूनक विस्कळीत झालेली आहे. हा एक महत्त्वाचा सागरी मार्ग आहे ज्यातून जगातील सुमारे २० टक्के एलएनजी आणि कच्च्या तेलाचा व्यापार होतो. इराण युद्धावरील तणावामुळे कतारने या आठवड्यात एलएनजी पुरवठा पूर्णपणे थांबवला. युरोपसाठी हा एक मोठा धक्का आहे. कतार युरोपियन युनियनच्या (ईयू) गॅसच्या गरजांपैकी ६ टक्के गरजा पूर्ण करतो. युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यापासून, युरोपने रशियन गॅसपासून स्वतःला दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले आहेत. मोठ्या प्रमाणात, ते यशस्वी झाले आहेत. सध्या, नॉर्वे (३०%) आणि अमेरिका (५८%) हे युरोपातील सर्वात मोठे एलएनजी पुरवठादार म्हणून उदयास आले आहेत. असे असूनही, कठोर वास्तव असे आहे की युरोप रशियापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकलेला नाही. फ्रान्स, स्पेन आणि बेल्जियमसारखे प्रमुख देश अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात एलएनजी आयात करतात.
सतत पाश्चात्य निर्बंधांना तोंड देत, रशियाने आपली रणनीती बदलली आहे. त्याने आपला गॅस पुरवठा चीन, हिंदुस्थान आणि इतर आशियाई देशांकडे वळवला आहे. व्लादिमीर पुतिन यांनी आता महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी या कठीण वेळी गॅस लाईन्स तोडल्या तर युरोपकडे त्वरित पर्याय उरणार नाही. जागतिक अशांततेमुळे त्यांचे पर्याय आधीच मर्यादित झाले आहेत. म्हणून, गॅस पुरवठा थांबविण्याचा थेट परिणाम युरोपच्या अर्थव्यवस्थेवर होईल आणि संपूर्ण व्यवस्था ठप्प होऊ शकते. त्यामुळे पुतिन यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.
Comments are closed.