IND vs ENG: टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी! श्रीलंकेनंतर असा पराक्रम करणारा ठरू शकतो जगातील दुसरा देश

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-20 विश्वचषक 2026 चा दुसरा उपांत्य सामना (सेमीफायनल) खेळवला जाईल. न्यूझीलंडचा संघ पहिली सेमीफायनल जिंकून आधीच फायनलमध्ये पोहोचला आहे. आज दुसऱ्या संघाचा निर्णय होईल. यादरम्यान टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ श्रीलंकेच्या संघाने जे करून दाखवले आहे, तेच करण्याची संधी आता टीम इंडियाकडे आहे.
खरं तर, 2007 पासून आतापर्यंत झालेल्या टी-20 विश्वचषकांमध्ये केवळ एकदाच असे घडले आहे की, एखादा यजमान देश (Host Country) या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. आता दुसऱ्यांदा टीम इंडियाकडे तसे करण्याची संधी आहे. 2012 मध्ये टी-20 विश्वचषकाचे यजमानपद श्रीलंकेकडे होते आणि शानदार खेळ करत श्रीलंकेने फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र, फायनलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तोच असा क्षण होता जेव्हा एखादा यजमान देश टी-20 विश्वचषकाचे जेतेपद मिळवण्याच्या अगदी जवळ होता, पण श्रीलंकेची संधी हुकली.
आता टीम इंडियाने आज टी-20 विश्वचषक 2026 मध्ये इंग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना जिंकला, तर श्रीलंकासारखा पराक्रम करणारा भारत जगातील दुसरा देश ठरेल. पण त्यासाठी इंग्लंडचे आव्हान पार करावे लागेल. तसेच, जर टीम इंडियाने फायनलमध्ये पोहोचून न्यूझीलंडला हरवून विजेतेपद पटकावले, तर असा पराक्रम करणारा भारत जगातील पहिला संघ ठरेल.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही यजमान देशाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही, आता भारताकडे ती संधी आहे. तसेच, टी-20 विश्वचषकात आतापर्यंत कोणताही संघ सलग दोनदा (Back to Back) जेतेपद मिळवू शकलेला नाही. भारताकडे पहिल्यांदा हा पराक्रम करण्याचीही संधी असेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पहिल्यांदाच एखाद्या आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. पहिल्याच स्पर्धेत तो आपल्या संघाला सेमीफायनलपर्यंत घेऊन येण्यात यशस्वी ठरला आहे. आता पुढचा प्रवास कुठपर्यंत जातो, हे पाहणे रंजक ठरेल.
Comments are closed.