Ind vs Eng: 3 वेळा अनलकी! शिवम दुबेच्या बाबतीत 19 वर्षांनंतर घडला ‘हा’ अजब प्रकार

टीम इंडिया आज इंग्लंडविरुद्ध आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत मैदानात उतरली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाने हा निर्णय चुकीचा ठरवत २० षटकांत ७ गडी गमावून २५३ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यातही स्टार फलंदाज शिवम दुबेने चांगली खेळी केली, पण तो पुन्हा एकदा धावबाद (रन आऊट) झाला. या स्पर्धेत दुबे तिसऱ्यांदा दुर्दैवी ठरला असून, १९ वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीसोबतही असेच घडले होते.

​इंग्लंडविरुद्धच्या या उपांत्य फेरीत भारतीय संघाने मोठा बदल करत शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. याचा फायदा घेत त्याने २५ चेंडूत ४३ धावांची शानदार खेळी केली, ज्यात १ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. ४३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर असताना शिवम दुबे हार्दिक पांड्याच्या चुकीमुळे धावबाद झाला. या स्पर्धेत शिवम दुबे धावबाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या एकाच हंगामात ३ वेळा धावबाद होणारा शिवम दुबे दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत असे घडले होते; त्यावेळी धोनी देखील ३ वेळा धावबाद झाला होता. दुबेला यापूर्वी रिंकू सिंगनेही धावबाद केले होते.

​नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा अवघ्या ९ धावा काढून स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर सर्वच खेळाडूंनी आपले महत्त्वाचे योगदान दिले. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८९ धावांची वादळी खेळी केली. तसेच इशान किशनने १८ चेंडूत ३९ धावा कुटल्या. शेवटी हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी छोट्या पण महत्त्वाच्या खेळी खेळल्या. याच सांघिक कामगिरीमुळे भारतीय संघाने २० षटकांत ७ बाद २५३ धावांपर्यंत मजल मारली.

Comments are closed.