IND vs ENG: जेकब बेथेलचं शतक व्यर्थ! इंग्लंडला हरवून टीम इंडियाची दिमाखात फायनलमध्ये धडक

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) चा दुसरा सेमीफायनल सामना गुरुवारी (5 मार्च) भारत आणि इंग्लंड (India vs England) दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या थरारक सामन्यात भारतीय संघ 7 धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. भारताने दिलेल्या 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या जेकब बेथेलने (Jackeb bethel) संघाला विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना बेथेलने 48 चेंडूंत 218.75 च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 7 देखणे षटकार ठोकले.
त्याच्याव्यतिरिक्त सहाव्या क्रमांकावर विल जॅक्सने 20 चेंडूंत 35, तर सलामीवीर जोस बटलरने 17 चेंडूंत 25 धावांचे योगदान दिले. भारताकडून आजच्या सामन्यात अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. अर्शदीपने विल जॅक्स (35), हार्दिकने फिल सॉल्ट (05), बुमराहने हॅरी ब्रूक (07), वरुण चक्रवर्तीने जोस बटलर (25) आणि अक्षर पटेलने टॉम बँटन (17) यांना बाद केले.
तत्पूर्वी, वानखेडे स्टेडियमवर टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमावून 253 धावा केल्या. सलामीला आलेल्या संजू सॅमसनने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. त्याने 42 चेंडूंचा सामना करताना 211.90 च्या स्ट्राईक रेटने ही धावसंख्या उभारली. क्रिकेट चाहत्यांना त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 7 षटकार पाहायला मिळाले.
केवळ संजूच नाही, तर फलंदाजीदरम्यान शिवम दुबे (Shivam Dube & Ishaan kishan) आणि ईशान किशन यांचाही तडाखा पाहायला मिळाला. चौथ्या क्रमांकावर खेळताना दुबेने 25 चेंडूंत 43 धावा केल्या, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशनने 18 चेंडूंत 39 धावा कुटल्या. या दोघांशिवाय हार्दिक पंड्याने 12 चेंडूंत वेगाने 27 धावा जोडल्या.
अभिषेक शर्माची बॅट आजच्या सामन्यातही शांत राहिली. त्याने 7 चेंडूंत फक्त 9 धावा केल्या. विल जॅक्सने त्याला सॉल्टच्या हाती झेलबाद करत माघारी धाडले. इंग्लंडकडून आज तीन गोलंदाजांना यश मिळाले. यामध्ये विल जॅक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चरने 1 विकेट घेतली. या विजयासह टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता फायनलचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवार 8 मार्च रोजी खेळला जाणार आहे.
Comments are closed.