ओमकारच्या 21 धावांत 5 विकेट
ओमकार सावंतची भेदक गोलंदाजी आणि सुमेद वेवट्रेची अर्धशतकी खेळीच्या जोरावर अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाने विहंग इंटरप्राइजेसचा आठ विकेट राखून पराभव करत सुवर्ण महोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. विहंग इंटरप्राइजेसला अवघ्या 78 धावांत गुंडाळल्यावर दोन फलंदाजांच्या मोबदल्यात 81 धावा बनवून अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाने विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या विहंग इंटरप्राइजेसच्या फलंदाजानी सामन्यात सपशेल निराशा केली. त्यांच्या तीनच फलंदाजांना धावांचा दुहेरी आकडा गाठता आला. डावात 15 धावा करणारा सुधीर यादव संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याखालोखाल संदीप यादवने नाबाद 10 आणि रणजीत मगरने 12 धावा बनवल्या. ‘सामनावीर’ ठरलेल्या ओमकारने 7 षटकांत 21 धावांच्या बदल्यात अर्धा संघ बाद केला. देवीकिरण चेट्टीने तीन आणि अजिंक्य पवारने दोन फलंदाज बाद केले. अप्लाईड क्लाऊड कॉम्प्युटिंग संघाने 11.3 षटकांत 81 धावांसह विजय नक्की केला. सुमेदने संघाला विजयाचा दरवाजा उघडून देताना 24 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकत 51 धावा केल्या. वैभव मजगेने नाबाद 26 धावा केल्या. संदीप यादव आणि आर्यन देशमुखने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
Comments are closed.