नितीशकुमार राज्यसभेवर जाणार आहेत

बिहारमधून उमेदवारी अर्ज, राज्याला नवा मुख्यमंत्री

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

बिहारला आता नवे मुख्यमंत्री मिळणार हे स्पष्ट झाले आहे. 2005 पासून राज्याची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा त्याग करणार असून राज्यसभेत जाणार आहेत. त्यांनी गुरुवारी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी बिहारमधून आपले आवेदन पत्र सादर केले आहे. ही निवडणूक 16 मार्चला होणार असून त्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य होतील. त्याआधी ते मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देतील. परिणामी राज्याला नवे मुख्यमंत्री मिळणार असून ते भारतीय जनता पक्षाचे असतील अशी शक्यता आहे. स्वत: नितीश कुमार यांनी ही माहिती ‘एक्स’ वर संदेश प्रसारीत करुन दिली आहे. ‘बिहारमधील नव्या सरकारला माझा पूर्ण पाठिंबा असेल. नवे सरकार माझ्या पाठींव्यावर आणि माझ्या मार्गदर्शनात चालेल, असे त्यांनी संदेशात स्पष्ट केले आहे. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचा याचवेळी बिहारच्या राजकारणात प्रवेश होणार असून ते राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

अमित शाह यांच्या सांन्निध्यात उमेदवारी

नितीश कुमार यांनी गुरुवारी पाटणा येथे राज्यसभा उमेदवारी आवेदनपत्र सादर केले. यावेळी त्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे होते. तसेच कुमार यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्य आणि संयुक्त जनता दलाचे अनेक नेतेही उपस्थित होते. गुरुवारी सकाळी नितीश कुमार यांनी आपली उमेदवारी सादर केली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा उद्रेक

मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा नितीश कुमार यांनी केल्यानंतर संयुक्त जनता दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट उसळली होती. पाटणा येथील पक्षाच्या मुख्यालयात नाराज कार्यकर्त्यांनी आणि काही स्थानिक पातळीवरील नेत्यांनी एकत्र येत तोडफोड केल्याचे वृत्त आहे. कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडू नये, यासाठी कार्यकर्ते त्यांची मनधरणी करीत आहेत. तथापि, कुमार यांनी आता राज्यसभेत जाण्यासाठी सज्जता चालविली असून ते निर्णय फिरविणार नाहीत, हे स्पष्ट आहे.

मुख्यमंत्रीपदासंबंधी उत्सुकता

बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण होणार, याविषयी राजकीय वर्तुळाप्रमाणे सर्वसामान्यांच्या मनातही उत्सुकता आहे. आता हे पद भारतीय जनता पक्षाला मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे नाव सर्वात आधी घेतले जात आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांचेही नाव चर्चेत आहे. यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी, तो येत्या एकदोन दिवसांमध्ये होईल. सम्राट चौधरी यांचीच निवड केली जाईल, ही प्रबळ शक्यता पक्षाकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

अविस्मरणीय कार्यकाळ

नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदी 2005 पासून सलग जवळपास साडेवीस वर्षे राहिले आहेत. मध्ये त्यांनी अल्पकाळासाठी हे पद जीतनराम मांझी यांच्याकडे सोपविले होते. नितीश कुमार आपल्या पक्षासह 1998 पासून भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत. तथापि, त्यांनी या काळात तीन वेळा आपल्या भूमिकेत परिवर्तन केले. मात्र, लोकांवरचा त्यांचा प्रभाव कमी झाला नाही. नितीश कुमार कोणाच्याही बाजूने असले तरी बिहारमध्ये मतदार मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूनेच राहिले. त्यामुळे 2005 ते 2026 या काळात 10 वेळा त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम केला. लालूप्रसाद यादव यांच्या अनागोंदी कारभारापासून बिहारला मुक्त करण्यात त्यांना यश आले. ते ‘सुशासनबाबू’ म्हणून परिचित राहिले. बिहारमध्ये त्यांनी कायद्याचे राज्य सुस्थापित केले. त्यांचा मुख्यमंत्रीपद त्याग हा एका देदिप्यमान युगाचा अंत आहे, असे मानले जात आहे.

बिहारमधील नितीश युग संपणार…

  • राज्यसभा निवडणुकीपूर्वी बिहारला मिळणार नवीन मुख्यमंत्री, प्रशासन
  • भावी मुख्यमंत्री, प्रशासनाला नितीश कुमार यांचा मन:पूर्वक आशीर्वाद
  • मुख्यमंत्रीपद आता भारतीय जनता पक्षाकडे दिले जाण्याची दाट शक्यता

Comments are closed.