कोणत्याही निवडणुकीसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार होऊ नये, हीच आमची भूमिका; संजय राऊत यांचे स्पष्ट मत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होत आहे, ही चांगली बाब आहे. राज्यसभेसाठी निवडणुकीची गरज नसेल तर उगाच घोडेबाजार करण्याची गरज नाही. महाराष्ट्रात घोडेबाजार होऊ नये, असे आमचे मत आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट करत कोणत्याही पक्षाने विनाकारण घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सुनावले.

राज्यसभेसाठी निवडणुकीची गरज नसेल तर उगाच घोडेबाजार करण्याची गरज नाही. महाराष्ट्रात घोडेबाजार होऊ नये, असे आमचे मत आहे. विधानपरिषदेच्या दोन जागा आणि राज्यसभेची एक जागा निवडून देण्याएवढे महाविकास आघाडीचे संख्याबळ आहे. मात्र, घोडेबाजार करावा, अनेकांना लागलेली पैशांची चटक वाढवावी, असे कोणाला वाटत असेल तर ते राज्याच्या प्रतिष्ठेला, प्रतिमेला आणि इभ्रतीला धक्का लावत आहेत.

आगामी काळात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकाही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. महाविकास आघडी आणि मित्रपक्ष यांचे गणीत जुळले तर आम्ही दोन जागा मिळवू शकतो. सध्या सत्ताधारी पक्षाकडे पाशवी बहुमत आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीच्या इशाऱ्यावर घोडेबाजार करू नये, अशी आमची इच्छा आहे. दिल्लीतील सरकार हे घोडेबाजारातून आलेले आहे, त्यामुळे त्यांचे सल्ले ऐकत राज्याच्या प्रतिष्ठेला कोणीही कलंक लावू नये, अशी आमची भूमिका आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम अर्थसंकल्प सादर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प त्यांनी सादर करावा. त्यांच्या उद्योगपती मित्रांसाठी अर्थसंकल्प असल्याची जनतेची भावना होऊ नये, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

Comments are closed.