इंग्लंडच्या पराभवाला करनच कारण, श्रीकांत यांचा हल्ला
हिंदुस्थानने उभारलेल्या डोंगराएवढया 253 धावांच्या लक्ष्याचा इंग्लंडने जोरदार पाठलाग केला, पण निर्णायक क्षणी सॅम करनची मंद खेळी इंग्लंडच्या गळ्यात पडली. महत्त्वाच्या वेळी जास्त चेंडू खेळून कमी धावा केल्याने इंग्लंडची धावगती कोसळली आणि त्याचा थेट फटका संघाला बसला, अशा शब्दांत हिंदुस्थानचे माजी सलामीवीर कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी करनवर तिखट शब्दांत टीका केली.
वानखेडेवर झालेल्या थरारक उपांत्य फेरीत हिंदुस्थानने 253 धावांचा डोंगर उभा केला होता. इंग्लंडचा जेकब बेथेल मात्र एकहाती लढत देत संघाला विजयाच्या उंबरठयावर घेऊन गेला. पण शेवटच्या टप्प्यात इंग्लंडला अवघ्या 7 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
करनचा मंद डाव ठरला घातक
एका युटयूब चॅनेलवर बोलताना श्रीकांत म्हणाले, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हिंदुस्थानच्या फलंदाजांनी 20 षटकांत 253 धावांचा प्रचंड डोंगर उभारला. इंग्लंडच्या गोलंदाजांना संपूर्ण सामन्यात धावा रोखण्यासाठी झगडावे लागले. विशेषतः सॅम करनची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने चार षटकांत तब्बल 53 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.
इंग्लंडच्या डावातील एकमेव उजवा पैलू म्हणजे जेकब बेथेलची धडाकेबाज खेळी. त्याने अवघ्या 48 चेंडूत 105 धावांची तुफानी खेळी करत सामना जिवंत ठेवला. पण त्याच्या या झंझावाती खेळीला करनच्या मंद डावाने साथ दिली नाही.
Comments are closed.