जागतिक शक्ती संतुलनाचे केंद्र समुद्र बनत आहे.

पश्चिम आशिया संकटावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचे वक्तव्य

वृत्तसंस्था/ कोलकाता

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम आशियात वाढत्या संघर्षावर तीव्र चिंता व्यक्त केली. बदलत्या जागतिक राजकारणात समुद्र पुन्हा एकदा शक्तिसंतुलनाच्या केंद्रस्थानी आला आहे. यामुळे आत्मविश्वास आणि पूर्ण क्षमतेने सागरी क्षेत्राचे नेतृत्व करणे ही आता भारताची जबाबदारी असल्याचे उद्गार राजनाथ सिंह यांनी कोलकात्यातील एका कार्यक्रमादरम्यान काढले आहेत. पश्चिम आशियातील स्थिती पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल प्रभाव पाडू शकते. पश्चिम आशियात जे घडतेय, ते सामान्य नाही. तेथील स्थिती कुठल्या दिशेने जाईल हे सध्या सांगणे अवघड असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

जागतिक व्यापाराला नुकसान

संरक्षणमंत्र्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी आणि पर्शियन सागराचे महत्त्व अधोरेखित केले. हा भाग जगाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा या क्षेत्रात एखादे संकट येते, तेव्हा याचा थेट प्रभाव तेल आणि वायूच्या पुरवठ्यावर पडतो. सध्या केवळ ऊर्जाक्षेत्रच नव्हे तर इतर सामग्रीच्या पुरवठासाखळीतही अडथळे निर्माण होत आहेत. या अनिश्चिततांमुळे जागतिक व्यापाराला नुकसान होत असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.

स्पष्ट व्हिजन राखावे लागणार

वर्तमान स्थितीने पुन्हा एकदा समुद्रांचे महत्त्व सिद्ध केले आहे. बदलत्या जागतिक राजकारणाच्या या काळात समुद्र शक्तिसंतुलनाच्या केंद्रस्थानी आला आहे. एक मोठा सागरी देश म्हणून भारताला स्पष्ट व्हिजनसह समोर यावे लागेल अशी टिप्पणी राजनाथ यांनी केली.

Comments are closed.