महिनाअखेरीस माओवाद संपेल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून पुनरुच्चार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्याच्या मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत देशातून माओवादाचे उच्चाटन केले जाईल, याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. ते ओडीशातील कटक येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 57 व्या स्थापनादिनी भाषण करत होते. ज्यांना तिरुपती ते पशुपती असा एक माओवादाच्या प्रभावाचा पट्टा निर्माण करायचा होता. त्यांचा आता जवळपास नि:पात झाला आहे. यापुढे त्यांना देशात कोणतेही स्थान मिळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्याच्या केंद्र सरकारने सत्तेवर आल्यानंतर माओवादाविरोधात अभियान हाती घेतले. ते अभियान सुरक्षा दलांनी अत्यंत निष्ठापूर्वक चालविले. त्यामुळे देशाला छळणाऱ्या माओवादाचा अंत आता दृष्टीपथात आला आहे. या काळात सुरक्षा दलांनी अनेक जटील आणि धोकादायक कारवाया माओवाद्यांच्या विरुद्ध यशस्वी केल्या. अनेक कुप्रसिद्ध माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. शेकडो माओवादी शरण आले आणि त्यांनी हिंसाचाराचा त्याग केला. माओवाद्यांना संपविण्याच्या मार्गात अनेक अडथळे होते. तथापि, पराक्रमी सुरक्षा दलांनी ती आव्हाने स्वीकारुन माओवाद प्रथम नियंत्रणात आणला आणि आता तो संपण्याच्या मार्गावर आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत माओवादाचा अंत निश्चित आहे. तसेच पुन्हा तो डोके वर काढणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे प्रतिपादन शाह यांनी केले.
सीआयएसएफची भूमिका महत्वपूर्ण
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) माओवाद्यांच्या विरोधात चालविण्यात येणाऱ्या अभियानात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या दलाने ओडीशा, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली. प्रत्येक कारवाई या दलाने अत्यंत निष्ठेने, निर्धारपूर्वक आणि अचूकपणाने केली. या अजोड कामगिरीमुळेच आज माओवाद आणि नक्षलवाद आटोक्यात आला असून आता तो संपण्याच्या मार्गावर आहे, असे शाह यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
खासगी उद्योगांनाही संरक्षण
सीआयएसएफ ही संस्था सरकारी उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. तथापि, भविष्यकाळात ही संस्था खासगी उद्योगांनाही संरक्षण देण्यास सिद्ध होणार आहे. यासाठी संस्थेची स्वतंत्र ‘हायब्रिड’ शाखा स्थापन करण्यात आली आहे. कारण खासगी उद्योगांनीही समाजकंटकांपासून आणि हिंसाचारी संघटनांपासून धोका आहे. चार वर्षांपूर्वी ही शाखा स्थापन करण्यात आली असून ती आता कार्यरत करण्यात येत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
Comments are closed.