नांदेडच्या होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, नातेवाईकांचा हॉस्टेल चालकावर आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नांदेड शहरातील हडको परिसरातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 6 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी होस्टेल चालकावर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा मुंजाजी गायकवाड (वय 25, रा. वाजेगाव) या युवतीने हडको भागातील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजशी संबंधित वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. 6 मार्च रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, मयत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी होस्टेल चालकाकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळेच आकांक्षाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वस्तीगृहाचे चालक जीवन घोगरे पाटील असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये काही ऑडिओ संदेश असल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून त्यामध्ये अपमानास्पद व अश्लील शब्दांचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणात संबंधित वस्तीगृह चालकाविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी नातेवाईक व स्थानिकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी नागरिकांकडू व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.