Ratnagiri crime news – मिऱ्या येथे पूर्ववैमनस्यातून मच्छिमारावर 9 वेळा सपासप वार; परिसरात तणावपूर्ण वातावरण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मिऱ्या गावामध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेंद्र ऊर्फ बावा नार्वेकर असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर मच्छिमार बोटीवरच धारदार शस्त्राने तब्बल ९ वार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मिऱ्या परिसरात खळबळ माजली आहे.
च्या
​मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १०:३० च्या सुमारास जयेंद्र नार्वेकर हे आपल्या मच्छिमार बोटीवर नेहमीप्रमाणे काम करत होते. यावेळी अचानक काही व्यक्तींनी बोटीवर येऊन त्यांच्यावर हल्ला चढवला. धारदार शस्त्राने त्यांच्या शरीरावर सपासप वार करण्यात आले, ज्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने रत्नागिरीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
च्या
​काही दिवसांपूर्वी भाटीमिऱ्या परिसरात शिमगोत्सवा दरम्यान ‘रांगोळी’ काढण्यावरून मोठा वाद झाला होता. श्री नवलाई पावणाईच्या पालखी स्वागतासाठी रांगोळी काढत असताना झालेल्या धक्काबुकीचे रूपांतर मोठ्या राड्यात झाले होते. त्यावेळी सुमारे १०० ते १५० लोकांचा जमाव समोरासमोर आला होता. या वादात जयेंद्र नार्वेकर यांचाही समावेश होता, अशी चर्चा परिसरात आहे. मध्यस्थांनी तो वाद मिटवला असला, तरी त्याच वादाचा वचपा काढण्यासाठी आज हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
च्या
​हा हल्ला नेमका कोणी केला आणि यामध्ये एकूण किती जणांचा सहभाग आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे. मिऱ्या परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण पसरले आहे.

Comments are closed.