होर्मुझच्या सामुद्रधुनीत हजारों जहाजे अडकली; इंधन कोंडीमुळे जागतिक महायुद्धाचा धोका वाढला
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग असलेला होर्मुझची सामुद्रधुनी सध्या युद्धाच्या छायेत आहे. इराणने या मार्गावर लष्करी नाकेबंदी केल्यामुळे हजार हून अधिक तेलवाहू टँकर्स आणि मालवाहू जहाजे मध्य समुद्रात अडकून पडली आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या कडक इशाऱ्यानुसार, कोणत्याही परकीय जहाजाने हा मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर हल्ला केला जाईल. या भीतीमुळे विमा कंपन्यांनी विमा हप्ते वाढवले असून जहाज मालकांनी आपली जहाजे थांबवून ठेवली आहेत, ज्यामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
या मार्गावरून जगातील सुमारे २५ टक्के कच्च्या तेलाचा आणि गॅसचा पुरवठा होतो. त्यामुळे ही कोंडी अधिक काळ कायम राहिल्यास जागतिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानसाठी देखील ही स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, कारण अडकलेल्या जहाजांमध्ये ३६ हिंदुस्थानी जहाजांचा समावेश असून हजारो हिंदुस्थानी खलाशी सध्या जीव मुठीत धरून आहेत. कतारने आपला गॅस पुरवठा तात्पुरता स्थगित केल्यामुळे आशियाई देशांमध्ये ऊर्जेचे मोठे संकट उभे राहिले आहे.
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, होर्मुझमधील ही परिस्थिती तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी टाकू शकते. जर अमेरिकेने आपल्या जहाजांना संरक्षण देण्यासाठी लष्करी कारवाई केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने हल्ला केला, तर रशिया आणि चीनसारख्या महासत्तांनाही या संघर्षात ओढले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओमानजवळ अलीकडेच एका जहाजावर झालेल्या हल्ल्यात दोन हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू झाल्याने तणाव आणखी वाढला आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आता या सागरी मार्गावरील नाकेबंदी कधी आणि कशी सुटते, याकडे लागले आहे.
Comments are closed.