T20WC2026: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ‘त्या’ निर्णयावर अक्षर पटेल खुश नव्हता; सूर्यकुमार यादवने सांगितला किस्सा

टी-20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) च्या अंतिम फेरीपर्यंत भारतीय संघाचा प्रवास अत्यंत शानदार राहिला आहे. आता 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (India vs newzealand final) यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल. या फायनल सामन्याच्या आदल्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) एक मोठा खुलासा केला.

त्याने सांगितले की, ‘सुपर-8’ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून वगळले गेल्यानंतर अक्षर पटेल (Axar Patel) अजिबात आनंदी नव्हता. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने सर्व सामने जिंकले होते. त्यानंतर सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात अहमदाबादमध्येच भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला. या सामन्यात टीम इंडियाने अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले होते. दुर्दैवाने, त्या सामन्यात भारताला 76 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी सूर्याने या निर्णयावर जास्त भाष्य केले नव्हते.

फायनलपूर्वी बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, सर्व कठीण निर्णय मी आणि कोच मिळून घेतो. जेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी अक्षरला डच्चू दिला, तेव्हा तो खुश नव्हता. मात्र, त्यानंतर आम्ही त्याला बसवून तो निर्णय का घेतला होता, हे नीट समजावून सांगितले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताची सेमीफायनलची वाट कठीण झाली होती. पण त्यानंतर अक्षर पटेलचे संघात पुनरागमन झाले आणि भारताने सेमीफायनल गाठली. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये अक्षरने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा दोन्ही आघाड्यांवर महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दोन महत्त्वाचे झेल घेतले आणि विल जॅक्सला बाद करण्यात मोठी भूमिका निभावली. आता सर्वांच्या नजरा फायनलमधील अक्षर पटेलच्या कामगिरीकडे लागल्या आहेत, कारण अहमदाबाद हे त्याचे ‘होम ग्राऊंड’ देखील आहे.

Comments are closed.