अंतिम लढतीपूर्वी टीम इंडियाची ‘हॉटेल रणनीती’
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी हिंदुस्थानचा संघ कोणताही धोका पत्करायला तयार नसल्याचे चित्र आहे. उद्याच्या निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाने अहमदाबादमधील आपले टीम हॉटेल बदलल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या हॉटेल रणनितीचा किती फायदा अंतिम लढतीत होतो याची उत्सुकता आहे.
हॉटेल बदलण्याचा निर्णय ‘लॉजिस्टिक कारणांमुळे’ घेतल्याचे सांगितले जात असले, तरी क्रिकेटप्रेमींमध्ये मात्र यामागे अंधश्रद्धेचाही धागा जोडला जात आहे. अहमदाबादच्या मैदानाचा उल्लेख होताच अनेक चाहत्यांच्या मनात 19 नोव्हेंबर 2023 ची आठवण अजूनही ताजी होते. त्याच मैदानावर एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानला पराभवाचा कडू घोट पचवावा लागला होता. त्या वेळी हिंदुस्थानी संघाचा मुक्कामही आयटीसी नर्मदा या हॉटेलमध्येच होता. म्हणूनच अंतिम सामन्यापूर्वी हॉटेल बदलण्याचा निर्णय हा केवळ व्यवस्थापनाचा भाग नसून ‘त्या पराभवाच्या आठवणींपासून दूर जाण्याचा प्रयत्न’ असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
न्यूझीलंडचे सलामीवीर फिन अ@लन आणि टिम सेफर्ट तुफानी फॉर्मात आहेत. त्यांच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडत असल्याने हिंदुस्थानी गोलंदाजांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. दुसरीकडे हिंदुस्थानकडून अभिषेक शर्माची बॅट अजूनही शांतच आहे. अंतिम सामन्यात तरी त्याच्या बॅटमधून धावांचा स्फोट होणार का आणि वरुण चक्रवर्ती पुन्हा ‘मॅजिकल’ फिरकी दाखवणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले आहेत.
सुपर 8 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर हिंदुस्थानी संघाने मात्र दिमाखदार पुनरागमन केले. सलग दमदार खेळ करत संघाने थेट अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे सुपर 8 मध्ये फारसे प्रभावी न दिसलेले न्यूझीलंड अचानक तावातावाने मैदानात उतरले आणि उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी धुक्वा उडवत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे रविवारी अहमदाबादमध्ये हिंदुस्थान-न्यूझीलंड ही अंतिम लढत जबरदस्त रंगणार आहे.
गोलंदाजीने कंबर कसावीच लागेल
हिंदुस्थानची गोलंदाजी गेल्या काही सामन्यांत थोडी ढासळलेली दिसते आहे. 253 धावा करूनही इंग्लंडला रोखताना घाम फुटल्याने गोलंदाजांच्या चुका उघड झाल्या. वरुण चक्रवर्तीची लय हरवल्याने प्रतिस्पर्धी फलंदाज त्याच्यावर हल्ला चढवत आहेत. हार्दिक पांडय़ा, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांच्याकडून अपेक्षित धार दिसत नाही. जसप्रीत बुमराह अपवाद ठरला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात इतिहास घडवायचा असेल तर गोलंदाजीचा स्तर उंचावणे हिंदुस्थानसाठी अनिवार्य आहे.
Comments are closed.