बिनशर्त शरणागती? ट्रम्प, तुमचे स्वप्न तुमच्यासोबत थडग्यात जाईल! इराणी अध्यक्ष पेजेश्कियान यांचा अमेरिकेला सज्जड इशारा
इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी असा दम भरणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणने आज जबरदस्त प्रत्युत्तर दिले. ‘‘आमची बिनशर्त शरणागती हे तुमचे स्वप्नरंजन आहे. हे स्वप्न तुमच्यासोबतच थडग्यात जाईल,’’ असे इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी ट्रम्प यांना ठणकावले. दरम्यान, अमेरिका-इराण युद्ध चिघळले असताना जगाचे टेन्शन वाढवणारी नवी माहिती समोर आली आहे. इराणच्या बाजूने रशिया युद्धात उतरण्याची शक्यता आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तशी तयारी दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. तसे झाल्यास तिसऱया महायुद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुतीन यांनी आज इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा केली. या वेळी त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यासह युद्धात मारल्या गेलेल्या इराणी नागरिकांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. तसेच युद्ध ताबडतोब थांबवून चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन त्यांनी दोन्ही बाजूंना केले. पुतीन-पेजेश्कियान यांच्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी बिनशर्त शरणागती पत्करण्याचे आवाहन इराणला केले होते. नवे नेतृत्व निवडल्यास अमेरिका आणि आमचे मित्र देश मिळून इराणला आधीपेक्षा महान व आर्थिकदृष्ट्या मजबूत देश बनवू, असे ट्रम्प म्हणाले होते. पेजेश्कियान यांनी ट्रम्प यांची ही ऑफर धुडकावून लावली.
अमेरिका म्हणते, रशिया-इराणवर बारीक लक्ष
रशिया इराणला अमेरिकेच्या विरोधात गुप्त माहिती पुरवत असल्याचे वृत्तावर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेट यांनी प्रतिक्रिया दिली. ‘रशिया आणि इराणच्या संभाव्य हालचालींवर अमेरिका बारीक लक्ष ठेवून आहे. त्यांच्यातील चर्चेची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे. त्याची फार फिकीर करण्याची गरज नाही,’ असे हेगसेट म्हणाले.
श्रीलंकेने अमेरिकेला सुनावले!
आयरिस देना युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर श्रीलंकन नौदलाने इराणच्या 32 सैनिकांची सुटका केली आहे. हे सैनिक सध्या श्रीलंकेत आहेत. त्यांना स्वदेशी पाठवले जाऊ नये यासाठी अमेरिकेकडून श्रीलंकेवर दबाव टाकला जात आहे. मात्र श्रीलंकेने हा दबाव झुगारून लावला आहे. इराणी खलाशांना आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारच वागवणार, असे श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेरथ यांनी ठणकावले आहे.
आम्हाला युद्धात का ओढले? यूएईमध्ये अमेरिकाविरोधी लाट
अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने अबुधाबी आणि दुबईवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे यूएईमध्ये अमेरिकेविरोधात संतापाची लाट आहे. यूएईतील उद्योगविश्व सर्वाधिक हादरून गेले आहे. यूएईचे अब्जाधीश उद्योजक खलफ अहमद अल् हब्तूर यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांनाच पत्र लिहिले आहे. आम्हाला युद्धात ओढण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असे त्यांनी ट्रम्प यांना ठणकावले.
रशियाकडून इराणला मदत
अमेरिकेच्या युद्धनौका, विमाने आणि अन्य लष्करी ठिकाणांना लक्ष्य करणे सोपे जावे यासाठी रशिया इराणला गुप्त माहिती पुरवत असल्याचे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले आहे. अमेरिका व इस्रायलने इराणवर लादलेल्या युद्धात उतरण्याचे रशियाचे हे संकेत आहेत.
तेल अवीववर रात्रभर हल्ला
आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांबरोबरच इराणने इस्रायलवरही प्रतिहल्ले सुरूच ठेवले आहेत. इराणी लष्कराने इस्रायलची राजधानी तेल अवीववर शुक्रवारी रात्रभर हल्ले चढवल्याने अक्षरशः पळापळ झाली. एकामागोमाग एक बॅलिस्टिक मिसाइल्स डागत इराणने बॉम्बवर्षाव केला.
इराणने मागितली शेजारील देशांची माफी
आखाती देशांत कराव्या लागत असलेल्या हल्ल्यांबद्दल मसूद पेजेश्कियान यांनी शेजारीलदेशांची माफी मागितली आहे. ‘‘शेजारच्या देशांच्या भूमीवरून इराणवर होणारे हल्ले बंद झाल्यास आम्ही त्या देशांना लक्ष्य करणार नाही,’’ असेही पेजेश्कियान यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.