गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे संतापाची लाट उसळली आहे

घरगुती 60 रुपये तर क्यावसायिक सिलिंडर 115 रुपयांनी महाग : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार : अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान एलपीजी सिलिंडरच्या किमती भडकल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होणार आहे. देशभरात घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची (14.2 किलो) किंमत 60 रुपयांनी वाढवल्यामुळे दर 900 रुपयांच्या पुढे गेला आहे. याव्यतिरिक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (19 किलो) किंमतही 115 रुपयांनी वाढवण्यात आली असून त्याचा दर 1,900 ते 2,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 7 मार्च 2026 पासून नवीन दर लागू केले आहेत.

देशभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 7 मार्चपासून वाढ करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या देशातील प्रमुख महानगरांमध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता 913 रुपये झाली आहे. यापूर्वी दिल्लीत हा दर 853 रुपये इतका होता. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमतही आता 115 रुपयांनी वाढली असून हा दर दिल्लीत 1,880 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य ग्राहकांच्या स्वयंपाकघरांवर थेट परिणाम होणार आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स, भोजनालये आणि केटरिंग व्यवसायांशी संबंधित लोकांचा खर्च वाढेल. याचा परिणाम भविष्यात अन्नधान्याच्या किमतींवरही होऊ शकतो.

देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये फरक राज्य-विशिष्ट कर आणि व्हॅटमुळे वेगवेगळा असतो. नवीन दरांनुसार, मुंबईत घरगुती सिलिंडरची किंमत 912.50 रुपये आहे, तर कोलकातामध्ये ती 939 रुपये आहे. चेन्नईतील ग्राहकांना 928.50 रुपये मोजावे लागतील. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीतील 913 रुपयांवर पोहोचली आहे.

यापूर्वीची वाढ 11 महिन्यांपूर्वी

इंडियन ऑइलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 14.2 किलोच्या विना-अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 11 महिन्यांपूर्वी 8 एप्रिल 2025 रोजी शेवटची वाढ करण्यात आली होती. एप्रिलमध्ये किंमती 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. 30 ऑगस्ट 2023 नंतर 14.2 किलोच्या विना-अनुदानित एलपीजी सिलिंडरची ही सर्वाधिक किंमत आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

व्यावसायिक सिलिंडरही महाग

घरगुती सिलिंडरप्रमाणेच 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत प्रतिसिलिंडर 114.50 ने वाढली आहे. त्यानंतर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 1,883 रुपये, कोलकातामध्ये 1,990 रुपये, मुंबईत 1,835 रुपये आणि चेन्नईमध्ये 2,043.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या आठवड्यात झालेली ही दुसरी आणि यावर्षी जानेवारीनंतरची चौथी वाढ आहे. 1 मार्च रोजी 19 किलोग्रॅमचा व्यावसायिक सिलिंडर 28 रुपयांनी महागला होता. त्यानंतर आता केवळ सात दिवसात त्यात आणखी 114.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यावर्षी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर 302.50 रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीमुळे हॉटेलमधील अन्नपदार्थांचे दरही वाढू शकतात.

नव्या सिलिंडर बुकिंगसाठी

आता 21 दिवसांची प्रतिक्षा एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमात बदल

एकीकडे दरांमध्ये मोठी वाढ करतानाच दुसरीकडे गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमातही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या नियमानुसार एलपीजी गॅस बुकिंगसाठी 15 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. आता ही मुदत 21 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. साहजिकच आता दोन गॅस बुकिंगमध्ये किमान 21 दिवसांचे अंतर असणे गरजेचे आहे. त्यामुळे एक सिंलिंडर संपल्यानंतर 21 दिवसांच्या आत पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडर बुक करता येणार नाही. एलपीजी गॅसच्या बुकिंगमधील बदल तात्काळ स्वरुपात लागू करण्यात आले आहे. काही कंपन्यांनी याबाबत तत्काळ अंमलबजावणी सुरू केली नसली तरी येत्या काही दिवसात नवीन नियम लागू होणार आहे.

प्रमुख शहरांमधील घरगुती सिलिंडरची किंमत

शहर                      नवीन दर                जुना दर

दिल्ली 913.00 853.00

कोलकाता 939.00 879.00

मुंबई                      912.50                 852.50

चेन्नई 928.50 868.50

भोपाळ                  918.50                 858.50

जयपूर                  916.50                  856.50

पाटणा                   1,011.00               951.00

रायपूर                  984.00                824.00

व्यावसायिक सिलिंडरचे सुधारित दर

दिल्ली                    1883 रुपये

मुंबई                     1835 रुपये

कोलकाता 1990 रु

चेन्नई                    2043.50 रुपये

 

Comments are closed.