हरियाणात आगीत पाच महिलांचा मृत्यू

कारखान्यातील दुर्घटनेत 17 कामगार होरपळले

वृत्तसंस्था/ जिंद

हरियाणातील जिंद येथे शनिवारी होळीचे रंग आणि गुलाल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. या दुर्घटनेत पाच महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य 17 कामगार होरपळले आहेत. जखमी झालेल्यांमध्येही बहुतेक महिला कामगारांचाच समावेश असल्याचे सांगण्यात आले. आग कशी लागली हे अद्याप कळलेले नाही. माहिती मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद इम्रान रझा आणि पोलीस अधीक्षक कुलदीप सिंग यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली.

आगीत होरपळलेल्या कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची घटना सफीदोनच्या भाट कॉलनीतील एका रंग कारखान्यात घडली. शनिवारी सकाळी सुमारे 30 कामगार नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक आग लागली. ही आग काही मिनिटांतच संपूर्ण परिसरात पसरली. सर्वत्र धूर आणि ज्वाळा पसरल्यामुळे कामगारांमध्ये घबराट पसरली. याप्रसंगी कारखान्याचे मुख्य गेट बाहेरून बंद असल्यामुळे आग लागली तेव्हा कामगार पळून जाऊ शकले नाहीत. अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि बराच प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणली.

Comments are closed.