न्यूझीलंडच्या अनुभवी वेगवान गोलंदाजाने जाहीर केली वनडेमधून निवृत्ती, टी20 क्रिकेट खेळणार

न्यूझीलंडच्या एका क्रिकेटपटूने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. १५ वर्षाच्या कारकिर्दीनंतर या खेळाडूने वनडे क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे ठरवले आहे. तसे ती टी२० क्रिकेटमध्ये खेळणे सुरूच ठेवणार आहे. आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात आज (८ मार्च) भारत आणि न्यूझीलंड समोरा-समोर येत आहे. अशातच न्यूझीलंड क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. त्यांच्या एका महिला क्रिकेटपटूने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

वेगवान गोलंदाज ली ताहुहू हीने वनडे क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने तिच्या १५ वर्षांच्या वनडे कारकिर्दीला निरोप दिला आहे, परंतु ती टी२० क्रिकेट खेळत राहील. तिचे न्यूझीलंड क्रिकेटमध्ये महत्वाचे योगदान राहिले आहे. ती न्यूझीलंडकडून वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी खेळाडू आहे.

लीने वयाच्या २०व्या वर्षी २०११मध्ये वनडेमध्ये पदार्पण केले होते. त्या प्रकारामध्ये तिने १०३ सामने खेळताना १२५ विकेट्स घेतल्या आहेत. ती १०० पेक्षा अधिक वनडे सामने खेळणाऱ्या १२ खेळाडूंपैकी एक आहे.

ली चार आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये खेळली आहे. तिला आयसीसी महिला वनडे टीम ऑफ द इयर २०२३ मध्येही निवडले होते. ती म्हणाली, “आता वनडे क्रिकेटपासून दूर जाण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधत्व करणे गर्वाची बाब आहे. १०० पेक्षा अधिक वेळा वनडेमध्ये या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. ही माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे.”

२०२४मध्ये झालेल्या आयसीसी महिला टी२० विश्वचषकात न्यूझीलंड जिंकला होता. त्यामध्येही लीचा संघात समावेश होता. आता जूनपासून महिला टी२० विश्वचषक २०२६ सुरू होणार आहे. त्यामध्ये ली संघाचे विजेतेपद राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

लीने २०२१मध्ये कॅन्सरवर मात करत संघात पुनरागमन केले होते. पायावरील एक तीळ ज्याचा रंग हळू-हळू बदलत गेला, तेव्हा तिला त्वचेचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिने उपचार घेतले आणि पुन्हा संघात आली.

Comments are closed.