Us Israel Iran War – अबब, एका फटक्यात 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान! मध्य पूर्वेतील युद्धाचा हिंदुस्थानला फटका
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका हिंदुस्थानी शेअर बाजाराला बसला आहे. आठवड्याच्या व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. युद्धामुळे हिंदुस्थानी शेअर बाजारात मोठी विक्री झाल्यामुळे आतापर्यंत गुंतवणूकदारांचे सुमारे 31 लाख कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. तर सोमवारी पहिल्या सत्रात गुंतवणूकदारांचे 12 लाख कोटी बुडाले आहेत. सेन्सेक्स 2,299 अंकांनी घसरून 76,619 वर, तर निफ्टी 714 अंकांनी कोसळून 23,736 वर व्यवहार करत आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, परकीय निधीचा बाहेर पडण्याचा प्रवाह आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार हिंदुस्थानवर मोठा आर्थिक परिणाम होण्याची भीती यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत असल्याने निर्देशांक सातत्याने घसरत आहे. जागतिक अस्थिरतेमुळे परकीय गुंतवणूकदारांनी (FPI) गेल्या चार दिवसांत तब्बल 21,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
सोमवारी, बाजार भांडवलात सुमारे 12.78 ट्रिलियन रुपयांचे नुकसान झाले. ब्रेंट क्रूडचे दर एका आठवड्यात 25 टक्के पेक्षा अधिक वाढले असून प्रति बॅरल 114 डॉलरच्या पुढे गेल्याने महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. हिंदुस्थान हा तिसरा मोठा आयातदार असल्याने या दरवाढीमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
HDFC, ICICI आणि SBI सारख्या मोठ्या बँकांचे शेअर्स 5 टक्क्यांपर्यंत तर HPCL, BPCL सारख्या तेल कंपन्यांचे शेअर्स 8 टक्क्यांनी घसरले आहेत. जेट इंधनाच्या किमती वाढल्याने एअरलाइन्सच्या शेअर्सनाही फटका बसला असून इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. बाजारात सर्वत्र घसरण असताना, युद्धाच्या पार्श्वभूमीवर डिफेन्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र 6 टक्के वाढ दिसून आली आहे. बीएसई मिडकॅप निर्देशांक जवळपास 3 टक्क्यांनी घसरला, तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला.
तेलाच्या किंमती दीर्घकाळ प्रति बॅरल 100 डॉलर्सच्यावर राहिल्या तर ते देशाची आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच महागाई, रुपयावरील दबाव, त्याचे होणारे अवमूल्यन याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.
Comments are closed.