IND vs NZ Final: ‘प्रशिक्षक साहेब, हे हास्य तुमच्यावर…’, धोनीची पोस्ट व्हायरल; गंभीरनेही दिले भन्नाट उत्तर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा फडशा पाडत ICC T20 World Cup 2026 उंचावला आणि इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयी जल्लोषानंतर जगभरातून टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. कौतुक करणाऱ्यांमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचाही समावेश आहे. कॅप्टन कूल’ महेंद्र सिंग धोनीने सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. धोनीने या विजयासाठी खेळाडूंसह सपोर्ट स्टाफचे अभिनंदन केले असून, त्याची ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली आहे.

धोनीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या हसण्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. धोनीने लिहिले की, “प्रशिक्षक साहेब, हे हास्य तुमच्यावर खूप छान दिसते. हास्य आणि तीव्रता यांचा हा एक जबरदस्त कॉम्बो आहे. खूप छान केले मित्रांनो, आनंद घ्या!” इतकेच नव्हे तर, जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीचे कौतुक करताना त्याने मिश्किलपणे “बुमराहबद्दल काही न लिहिणेच उत्तम, तो एक चॅम्पियन बॉलर आहे,” असेही नमूद केले. धोनीच्या या शैलीने सोशल मीडियावर पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.

धोनीच्या या शुभेच्छांना गौतम गंभीरनेही तितक्याच आपुलकीने आणि आदराने प्रतिसाद दिला आहे. धोनीच्या पोस्टवर रिप्लाय देताना गंभीरने म्हटले की, “आणि हसण्याचं इतकं सुंदर कारणही आहे. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला.” या दोन्ही दिग्गजांमधील हा संवाद सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून, एकेकाळी मैदानावर एकत्र खेळणाऱ्या या दोन चॅम्पियन्सचा हा ‘दोस्ताना’ पाहून भारतीय क्रिकेट प्रेमी कमालीचे सुखावले आहेत. टीम इंडियाचा विजय आणि या दोन दिग्गजांमधील संवाद यामुळे विजयाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

Comments are closed.