IND vs NZ फायनल: विराट कोहलीने केले संजू सॅमसनचे कौतुक! 'चेट्टा, तू या यशास पात्र आहेस' अशी खास पोस्ट शेअर केली!

टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे (ICC T20 international world cup 2026) जेतेपद पटकावून टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद राखणारी (टायटल डिफेंड करणारा) भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयात संजू सॅमसनने (Sanju Samson) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटच्या तीन सामन्यांत सलग तीन अर्धशतके झळकावून तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याच्या या दमदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

संजूची ही कामगिरी पाहून विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ हा किताब जिंकणारा संजू सॅमसन आता विराट कोहली (Virat Kohli and Jasprit Bumrah) आणि जसप्रीत बुमराहनंतर तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताने एकूण 9 सामने खेळले, ज्यापैकी संजूला केवळ 5 सामन्यांत संधी मिळाली. या 5 सामन्यांत त्याने 80.25 ची सरासरी आणि 199.37 च्या स्ट्राईक रेटने 321 धावा केल्या. त्याच्या या धडाकेबाज कामगिरीनंतर विराटने इन्स्टाग्राम स्टोरीवर संजूला ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’चा खरा मानकरी असल्याचे म्हटले आहे.

विराटने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, या टी-20 वर्ल्ड कपचा सर्वात योग्य ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ संजू सॅमसन! तुझ्यासाठी ही स्पर्धा शानदार ठरली. जेव्हा संघाला तुझी सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तू सर्वोत्तम कामगिरी केलीस. चेट्टा (मोठ्या भावा), तुझ्यासाठी खूप आनंद होत आहे. विराटची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, स्पर्धेच्या सुरुवातीला संजू सॅमसन भारतीय संघाच्या अंतिम 11 (Playing XI) मध्ये नव्हता. खराब फॉर्ममुळे त्याला सुरुवातीला संधी मिळाली नव्हती. मात्र, नामीबियाविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला पोटाचा त्रास झाल्यामुळे संजूला संघात स्थान मिळाले. त्या सामन्यात त्याने 8 चेंडूत 22 धावा केल्या, पण अभिषेक बरा झाल्यावर त्याला पुन्हा बाहेर बसावे लागले. पुन्हा एकदा झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सुपर-8 सामन्यात संजूचे संघात पुनरागमन झाले. याचे कारण म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे ऑफ-स्पिनर्सविरुद्ध धावा काढण्यासाठी संघर्ष करत होते. संजूने या संधीचे सोने केले आणि टीम इंडियाला विश्वविजेते बनवण्यात मोलाचा वाटा उचलला.

Comments are closed.