मुंबईतील पहिले मॅन्ग्रोव्ह उद्यान नागरिकांसाठी खुले करा! आदित्य ठाकरे यांची सरकारकडे मागणी
गोराई येथील मुंबईतील पहिल्या मॅन्ग्रोव्ह उद्यानाचे काम पूर्ण होऊनही ते अद्याप जनतेसाठी खुले का करण्यात आले नाही, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य शासनाला केला आहे. सदर उद्यान तातडीने खुले करून नागरिकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना या पत्राद्वारे केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी गणेश नाईक यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण पर्यावरण मंत्री असताना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मुंबईतील पहिले मॅन्ग्रोव्ह उद्यान गोराई येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाची सुरुवात विशेष जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून करण्यात आली होती’ याची आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली आहे.
या उद्यानात निसर्गविषयक माहिती केंद्र, मॅन्ग्रोव्ह वॉक ट्रेल, पक्षी निरीक्षण केंद्र अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. पक्ष्यांच्या विविध प्रजाती तिथे पाहायला मिळणार असून, विशिष्ट ऋतूंमध्ये स्थलांतरित पक्षीदेखील या भागात येतात, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्र वन विभागाच्या खारफुटी कक्षाने 2021 मध्ये सुरू केलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी 2025 मध्ये अनेक वेळा तारखा जाहीर करण्यात आल्या. सुरुवातीला 1 मे 2025 रोजी हे उद्यान खुले होणे अपेक्षित होते. त्यानंतर 5 जून 2025 (जागतिक पर्यावरण दिन) पर्यंत पुढे ढकलण्यात आली. पुढे जुलै व ऑगस्ट 2025 या कालावधीत सुधारित वेळापत्रके देण्यात आली, याकडे आदित्य ठाकरे यांनी वनमंत्र्यांचे लक्ष वेधले.
राज्यात अन्य ठिकाणीही मॅन्ग्रोव्ह उद्याने उभारा
महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मॅन्ग्रोव्ह उद्यान उभारणे शक्य आहे, त्या प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे उद्यान उभारण्यात यावे, जेणेकरून पर्यावरण संवर्धन व पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होईल आणि इको टुरिझमला चालना मिळण्यास मदत होईल, असे मतही आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे.
Comments are closed.