बोगस मुली दाखवून लग्नाळू तरुणांची फसवणूक, एका मुलीचे चौघांशी लग्न लावून मुलांकडून हुंडा वसुली; आमदारांनी मांडले ग्रामीण भागातील विदारक वास्तव
कर्जाच्या बोझाखाली दबलेल्या शेतकऱयांना आता मुलांच्या लग्नाची चिंता सतावू लागली आहे. ग्रामीण भागात लग्नाळू शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. याचा गैरफायदा घेऊन काही टोळ्या बोगस मुली दाखवून मुलांची फसवणूक करत आहेत. एकाच मुलीचे चार–चार मुलांशी लग्न लावले जात आहे आणि त्यासाठी मुलांकडून हुंडा वसूल केला जात आहे, असे विदारक वास्तव आमदार प्रकाश सोळंके यांनी आज विधानसभेत मांडले.
कॉंग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी ग्रामीण भागातील हुंडा घेण्याच्या प्रकारांबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर चर्चेवेळी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील या ज्वलंत प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. गावात शेती करणाऱया तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या आहेत, पूर्वी मुलीकडच्या लोकांना हुंडा द्यावा लागत होता आता मुलांना लग्न करायचे तर हुंडा द्यावा लागत आहे, असे सोळंके यांनी सांगितले.
प्रत्येक गावात 100 तरुण बिनलग्नाचे
शेती करणाऱया मुलांना लग्नासाठी मुली द्यायला कुणी तयार नसल्याने त्यांचे वय उलटत चालले आहे. राज्यातील प्रत्येक लहान-मोठय़ा खेडेगावात 25 ते 30 वयोगटातील किमान 50 ते 100 तरुण असे आहेत, असे आमदार सोळंके यांनी सांगितले. लग्न होत नसल्याने तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हुंड्यासाठी एकाच मुलीची चार–चार लग्ने
शेती करणाऱया मुलांना लग्न करायचे असेल तर त्यांना मुलीकडच्या लोकांना हुंडा द्यावा लागत आहे. त्यामुळे एक रॅकेट सक्रिय झाले आहे जे बोगस मुली आणून त्यांची लग्ने लावून देतात आणि हुंडय़ापोटी अडीच-तीन लाख रुपये मुलाकडून उकळून त्यांची फसवणूक करतात. एकाच मुलीची चार-चार मुलांशी लग्ने लावली जात आहेत, असे आमदार सोळंके यांनी सभागृहात सांगितले आणि हे प्रकार रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार, असा प्रश्न उपस्थित केला.
विशेष कालबद्ध योजना आखणार, सरकारची ग्वाही
या लक्षवेधीला गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिले. आमदार सोळंके यांनी मांडलेली वस्तुस्थिती गंभीर असून त्यावर उपाययोजना केल्या जातील. विशेष कालबद्ध योजना आखली जाईल. महिला व बालकल्याण विभागाची एक समितीही यासंदर्भात कार्यरत असून तीसुद्धा सर्व परिस्थितीचा आढावा घेईल, अशी ग्वाही भोयर यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत नमिता मुंदडा यांनीही सहभाग घेऊन राज्यात घडलेल्या हुंडाबळीच्या घटना रोखण्यास सरकारने काय पावले उचलली, असा सवाल केला.
Comments are closed.