शापित गंधर्व ते महानायक!
>> क्रीडा प्रतिनिधी
ज्याला कधी संघाबाहेर बसविले गेले, ज्याच्या प्रतिभेबाबत कायम शंका उपस्थित केल्या गेल्या, तोच संजू सॅमसन अखेर टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणांगणात हिंदुस्थानचा सर्वात मोठा नायक ठरला! यजमान हिंदुस्थानने अंतिम लढतीत न्यूझीलंडला तब्बल 96 धावांनी धूळ चारत विजेतेपद कायम राखले, मात्र या जगज्जेतेपदाच्या प्रवासात सर्वात तेजस्वी चेहरा ठरला तो सॅमसन! यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाही नेहमीप्रमाणे संजू सॅमसन बाकावर बसलेला ‘शापित गंधर्व’ ठरला होता, मात्र नंतर संधी मिळताच त्याने आपली अनुभवी शिदोरी रिती करीत आपले नाणे खणखणीत वाजवून दाखविले व तो जगज्जेत्या ‘टीम इंडिया’चा खरा महानायक ठरला. ‘मालिकावीर’ची माळही याच महानायकाच्या गळ्यात पडली.
संजू सॅमसनने अंतिम सामन्यात खेळलेली 89 धावांची झंझावाती खेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसाठी दुःस्वप्न ठरली. तरीही ‘सामनावीर’चा किताब वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला मिळाला. मात्र, सॅमसनच्या खेळातील खरी उंची म्हणजे त्याची नम्रता! उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 89 धावा करीत ‘सामनावीर’ ठरल्यानंतरही त्याने हा सन्मान बुमरालाच मिळायला हवा होता, असे स्पष्टपणे सांगितले होते.
या विश्वचषकात यजमान हिंदुस्थानी संघ ‘नॉकआऊट’मध्ये पोहोचला, त्यामागे सॅमसनच्या बॅटची जादू कारणीभूत ठरली. ‘सुपर-8’ फेरीत वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकाता येथे त्याने नाबाद 97 धावांची खेळी करीत विजयात मोलाची भूमिका बजाविली. त्या खेळीनेच ‘टीम इंडिया’च्या विजयी मोहिमेला खरा वेग दिला.
सॅमसनची फलंदाजी ही केवळ धावांची नव्हे, तर सौंदर्याची कहाणी आहे. अचूक पायांची हालचाल, स्थिर डोके आणि शुद्ध टायमिंग. त्याच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक फटका क्रिकेटच्या पारंपरिक सौंदर्याची आठवण करून देतो. आधुनिक क्रिकेटच्या धडाकेबाज युगातही ‘क्लास’ म्हणजे काय, हे सॅमसन पुन्हा दाखवून देत आहे.
2015मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना संजू सॅमसन किशोरवयीन होता. ‘आयपीएल’मध्ये राजस्थान रॉयल्सकडून चमक दाखविणारा हा तरुण अनेकदा संघाबाहेर बसला, टीका सहन केली; पण त्याने कधीही आपल्या खेळाची दिशा बदलली नाही. देशाअंतर्गत क्रिकेटमध्ये ‘रणजी ट्रॉफी’सारख्या स्पर्धेमध्ये घाम गाळत त्याने स्वतःला अधिक मजबूत केले. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या 23 डावांत त्याच्या नावावर फक्त एक अर्धशतक होते. अनेकांनी त्याला ‘अपूर्ण प्रतिभा’ म्हणून हिणविले. पण सॅमसनने टीकेला उत्तर शब्दांनी नव्हे, तर बॅटने दिले. ‘गॉडफादर’ नसल्यामुळे संजूला अनेकदा संघाबाहेर बसावे लागले. त्याच्यावर अनेकदा अन्याय झाला; पण शेवटी टी-20 वर्ल्ड कपच्या प्लॅटफॉर्मवरच त्याने स्वतःला न्याय देत देशालाही जगज्जेते बनविले.
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनने 321 धावा जवळपास 200च्या स्ट्राइक रेटने चोपून काढत टी-20 क्रिकेटमधील आक्रमकतेचा नवा मापदंड ठरविला. सुरुवातीला अंतिम अकरात स्थान नसतानाही मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले आणि अखेर हिंदुस्थानच्या विजयी मोहिमेचा तो खरा शिल्पकार ठरला. सॅमसनला गटफेरीत एकदाच संधी मिळाली. मात्र, ‘सुपर-8’ फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या दारुण पराभवानंतर संघव्यवस्थापनाला पुन्हा संजू सॅमसनचा विचार करावा लागला. उपांत्य व अंतिम सामन्यांतील एकूण धावांच्या बाबतीतही सॅमसनने नवा विक्रम केला असून, त्याच्या 178 धावा या विराट कोहलीच्या 2014मधील कामगिरीपेक्षा अधिक आहेत. 175पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने इतक्या धावा करणारा तो टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात प्रभावी फलंदाज ठरला आहे. उपांत्य फेरीत जोफ्रा आर्चर आणि अंतिम सामन्यात लॉकी फर्ग्युसन यांच्या वेगवान गोलंदाजीवर त्याने खेळलेले दमदार पुल शॉट्स विशेष गाजले. त्यामुळे आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याची अडचण असल्याची धारणा पूर्णपणे खोटी ठरली.
दीर्घ संघर्ष, अविरत मेहनत आणि अढळ आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर सॅमसनने जगाला एकच संदेश दिला. प्रतिभा कधीच मरत नाही, ती फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असते. आणि त्या क्षणी ती अशी धडाक्यात उफाळून येते की, इतिहास लिहिला जातो!
Comments are closed.