12 मार्चला होणार निवडणूक, झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती कुठे बसणार?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक 12 मार्च रोजी पार पडणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतींची निवड करण्यात येईल. मात्र ही निवड झाल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापतींच्या दालनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. दालनांसाठी बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतीचे काम अर्धवट असल्याने झेडपीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती बसणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ ही तीन मजली इमारत धोकादायक असल्याने अडीच वर्षांपूर्वी रिकामी करण्यात आली. यानंतर जिल्हा परिषदेतील विविध विभागांची कार्यालये अलिबाग शहरातील कुंटे बाग येथे हलविण्यात आली. कुंटे बाग येथे पूर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विषय समिती सभापतींसाठी राहण्याची व्यवस्था होती. सध्या सभापतींना राहण्यासाठी बांधण्यात आलेले फ्लॅट आता कार्यालयात बदलण्यात आले आहेत. या ठिकाणी समाजकल्याण, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, स्वच्छता विभाग ही कार्यालये थाटण्यात आली आहेत. तसेच कुंटे बागेत सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग ही कार्यालये आहेत.

कुंटे बागेत लगबग

कुंटे बागेत सत्ताधारी आणि विरोधकांना बसण्यासाठी नव्या इमारतीचे काम सुरू आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू आहे. तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे बंगले आहेत. त्या ठिकाणी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे कार्यालय केले जाणार आहे. मात्र सभापती कुठे बसणार? हे कोडे सुटलेले नाही. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्य, पदाधिकारी यांना केबिनविना ताटकळत राहावे लागणार आहे.

Comments are closed.