भिवंडीत अल्पवयीन विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा आरोप; रहिवाशांचा मोर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. या तरुणीची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या हत्येचा गुन्हा दाखल करत मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी रहिवाशांनी अजमेरनगर ते नारपोली पोलीस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढला.

नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी दहावीत शिकत होती. ती बाथरूमला जाण्यासाठी घरातून बाहेर निघाली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. ती सापडत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र त्याच्या दोन दिवसांनंतर कैलासनगर टेकडीजवळ पोलिसांना तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला. हात कापलेला आणि चेहऱ्यावर अॅसिड फेकले होते. ही आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता.
शवविच्छेदन अहवालानंतर नवी दिशा मिळणार

नारपोली पोलिसांनी या प्रकरणात चौफेर दिशेने तपास सुरू केला आहे. तिचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याच्या अहवालानंतरच प्रकरणाला नवी दिशा मिळणार असल्याचे नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कडबाने यांनी सांगितले.

Comments are closed.