उल्हासनगरात सफाई कामगाराची ऑन ड्युटी हत्या, मृतदेह पाहताच पत्नीनेही आयुष्य संपवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कचरा उचलण्यास नकार दिला म्हणून नशेडी तरुणाने ड्युटीवर असलेल्या कंत्राटी सफाई कामगाराची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळी उल्हासनगरच्या सेक्शन 20 या भागात घडली. महादू जगताप (32) असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव आहे. दरम्यान आपल्या पतीचा मृतदेह बघून पत्नीनेही घरी आल्यावर गळफास घेऊन जीवन संपवले असून त्यांची दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. क्षुल्लक कारणावरून सफाई कामगाराची हत्या करणारा आरोपी दुर्गेश गुप्ता याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.

कॅम्प नंबर 3 मधील माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोरील कचरा का नेत नाही, असा प्रश्न दुर्गेश गुप्ता याने नशेमध्येच महादू याला विचारला. त्यावर साफसफाई करून कचरा साईडला लावणे एवढेच माझे काम असून हा कचरा उचलण्याची जबाबदारी माझी नाही, असे महादू जगताप याने सांगितले. त्यामुळे संतापलेल्या दुर्गेश याने चाकूने महादूवर लागोपाठ 31 वार केले व हल्लेखोर पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सफाई कामगाराला रुग्णालयात दाखल केले पण गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.

… आणि तिने हंबरडा फोडला

उल्हासनगरातील ही घटना समजताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर अवताडे हे तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आपल्या सहकाऱ्याची हत्या झाल्याचे समजल्यानंतर सफाई कामगार संघटनेच्या सदस्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. दरम्यान पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून पळून गेलेला हल्लेखोर दुर्गेश गुप्ता याच्या काही तासांतच मुसक्या आवळल्या. पतीच्या हत्येचे वृत्त समजताच पत्नी पूर्वी (28) हिच्या पायाखालची जमीनच सरकली. रुग्णालयात जाऊन तिने आपल्या पतीचा मृतदेह बघताच तिने अक्षरशः हंबरडा फोडला. शहाड गावठाण येथील घरी परतल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली.

कामबंद आंदोलन

या दाम्पत्याला दोन लहान मुले असून त्यांचे छत्र हरपले आहे. जोपर्यंत जगताप कुटुंबाला न्याय व नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत शहरातील सफाईचे काम बंद ठेवण्याचा इशारा कामगार नेते संदीप गायकवाड यांनी दिला आहे.

Comments are closed.