संजू सॅमसन बनू शकतो टीम इंडियाचा पुढचा टी20 कर्णधार; माजी भारतीय क्रिकेटपटूचा मोठा दावा

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये आपल्या दमदार कामगिरीने ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ (Player of the tournament) ठरलेला संजू सॅमसन सध्या चर्चेत आहे. फायनलसह सलग तीन बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावून त्याने भारताला चॅम्पियन बनवण्यात मोठी भूमिका बजावली. त्याच्या या फॉर्ममुळे आता त्याला भारतीय टी-20 संघाचा कर्णधार बनवण्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohmmed Kaif on Sanju Samson) असा दावा केला आहे की, सूर्यकुमार यादवच्या जागी सॅमसनला पुढील कर्णधार बनवले जाऊ शकते.
सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) गेल्या वर्षभरापासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्येही त्याची बॅट चालली नाही. तसेच, सूर्याचे वय सध्या 35 वर्षे असून 2028 च्या वर्ल्ड कपपर्यंत तो 37 वर्षांचा होईल. त्याचे वाढते वय पाहता बीसीसीआय भविष्यासाठी नवीन कर्णधाराचा विचार करू शकते. याआधीही असे घडले आहे; जेव्हा रोहित शर्माने (Rohit Sharma) भारताला ‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2025’ जिंकवून दिली होती, तरीही त्याच्याकडून वनडेची कॅप्टन्सी काढून शुबमन गिलकडे (Shubman gill) सोपवण्यात आली होती.
मोहम्मद कैफच्या मते, जर सूर्याला पदावरून हटवले गेले, तर संजू सॅमसन हा एक प्रबळ दावेदार असेल. कैफ म्हणाला, पुढचा कर्णधार कोण असेल हे आत्ताच सांगणे घाईचे होईल, पण संजू सॅमसनमध्ये नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता आहे. चांगला कर्णधार तोच असतो ज्याने चढ-उतार पाहिले आहेत, जो योग्य प्लेइंग इलेव्हन निवडू शकतो आणि फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंना साथ देऊ शकतो. संजूने 2021 ते 2025 पर्यंत राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली संघ 2022 मध्ये फायनलपर्यंत पोहोचला होता. 2026 च्या आयपीएलमध्ये संजू आता राजस्थानकडून नाही, तर चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून खेळताना दिसणार आहे. तसेच, 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजूने केवळ 5 सामन्यांत 80.25 च्या सरासरीने आणि 199.38 च्या स्ट्राईक रेटने 321 धावा केल्या.
कैफने पुढे नमूद केले की, जर सूर्याने चांगली कामगिरी सुरू ठेवली तर तोच कर्णधार राहील, पण बदल करायचा झाल्यास संजू हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
Comments are closed.