बुमराचा ‘वर्कलोड’ जपणार, वन डे वर्ल्ड कपसाठी टी-20 कमी खेळणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जसप्रीत बुमरा या टीम इंडियाच्या भेदक वेगवान गोलंदाजाला आता टी-20 क्रिकेटपासून काही प्रमाणात दूर ठेवण्याचा विचार सुरू झाला आहे. आगामी वर्षी होणारा वन डे क्रिकेट वर्ल्ड कप डोळय़ांसमोर ठेवून त्याच्यावरचा कामाचा ताण कमी करण्यासाठी ‘बीसीसीआय’ आणि संघ निवड समितीने ही रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. मोठय़ा स्पर्धांमध्ये बुमरा तंदुरुस्त राहणे हेच हिंदुस्थानी संघासाठी सर्वात मोठे ‘हत्यार’ मानले जात असल्याने ही खबरदारी घेतली जात आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही काळ द्विपक्षीय टी-20 मालिकांमध्ये जसप्रीत बुमराला मर्यादित संधी दिल्या जाणार आहेत. त्याऐवजी एकदिवसीय सामन्यांवर त्याचा अधिक भर राहणार आहे. 19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यानंतर बुमराने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही.

दरम्यान, 2027 पर्यंत टी-20 प्रकाराला तुलनेने कमी प्राधान्य दिले जाणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. त्या काळात जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सूर्यकुमार यादव हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व करू शकतो. आगामी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठय़ा स्पर्धांची रेलचेल आहे. 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषकासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर 2028 मध्ये टी-20 विश्वचषक,
ऑलिम्पिक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत.

बुमराबाबत रणनीती ठरणार

आयपीएल टी-20 क्रिकेटच्या थरारानंतर ‘बीसीसीआय’ची निवड समिती आणि संघ व्यवस्थापन एकत्र बसून जसप्रीत बुमराबाबत अंतिम रणनीती ठरवणार आहेत. या स्पर्धेत बुमरा मुंबई इंडियन्सच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करणार आहे. हिंदुस्थानी संघाच्या मोठय़ा मोहिमांमध्ये बुमराची तंदुरुस्ती हीच खरी ताकद असल्याने त्याच्या सामन्यांचे नियोजन आता अधिक काळजीपूर्वक केले जाणार आहे.

Comments are closed.