आखाती देशांतील संघर्षामुळे फॅशन उद्योग अडचणीत, नामांकित ब्रँड्सकडे कपड्यांचा तुटवडा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम दैनंदिन गरजांवर होण्यास सुरुवात झाली आहे. या संघर्षाचा फटका फॅशन जगतालाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. हिंदुस्थानात असलेल्या ख्यातनाम झारा, एचएनएम यांच्यासारख्या विविध फॅशन ब्रँड्ससाठी तयार केलेल्या कपड्यांच्या शिपमेंट जगभरातील विविध विमानतळांवर अडकल्या आहेत. त्यामुळे आता नामांकित ब्रँड्समध्ये कपड्यांच्या व्हरायटीमध्ये कपात दिसून येत आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उकाडा जोरदार सुरू झाला आहे. त्यामुळेच कॉटनच्या कपड्यांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या घडीला अनेक शिपमेंट्स बंदरमार्गे आणि हवाईमार्गे अडकल्याने, आता बाजारातही नवीन साठा शिल्लक नाही. यामुळे फॅशन उद्योगाला चांगलाच फटका सहन करावा लागत आहे. कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत. इमिरेटस्, कतार एअरवेज आणि एथियाद एअरवेज यासारख्या गल्फ एअरलाइन्सला युद्धाचा मोठा फटका बसला आहे. युद्धामुळे या विमानसेवांनी त्यांच्या फेऱ्या मर्यादित केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आशियातील कपडे निर्यात करणाऱ्या कंपन्यांना जोरदार फटका बसला आहे. मुंबईतील व्यापारी रमेश ठक्कर यांचा मालही सध्याच्या घडीला बांगलादेशात अडकला आहे. यासंदर्भात ‘सामना’शी बोलताना ते म्हणाले, ‘युद्ध सुरू झाल्यानंतर माझे एकही शिपमेंट आले नाही. दक्षिण आशियातून येणारे कपडे मी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वितरीत करण्याचे काम करतो. परंतु आता माल अडकला आहे, शिवाय मालावर लागणारा विमा देखील काही लाखांमध्ये वाढला आहे.’

दुबईत कोंडी

फॅशनची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमध्ये येणारा बराचसा माल दुबईत अडकला आहे. दक्षिण आशियातून येणारे कपडे हे प्रामुख्याने दुबई मार्गे लंडनला पाठवले जातात. दुबई विमानतळावरील कामकाज ठप्प झाल्याने पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ निर्यातदारांवर आली आहे.

कापड व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

धारावीमध्ये चामड्याचे कपडे उत्पादन करणाऱ्या महेश कांबळे यांनाही सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीचा चांगलाच फटका बसला आहे. ते म्हणाले, ‘विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केल्यानंतर मालवाहतुकीचे दर जवळपास तिप्पट झाले आहेत. त्यामुळे आता नफ्याचे गणित बदलले आहे.’ कांबळे यांचा माल मुंबईहून दुबईसह इतर अनेक देशांमध्ये जातो. परंतु सध्याची एकूणच अस्थिर परिस्थिती पाहता, कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे त्यांनी ‘सामना’शी बोलताना नमूद केले. एकूणच मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम हा आता केवळ ठराविक क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नसून, जागतिक फॅशन पुरवठा बाजारही चांगलाच कोलमडला आहे.

Comments are closed.