Iran Israel US War – होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरूंग पेरणाऱ्या 16 इराणी युद्धनौका उद्ध्वस्त; अमेरिकेची कारवाई, थरारक व्हिडीओ समोर
जगातील अत्यंत महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी भागात तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अमेरिकन सैन्याने समुद्रात सुरूंग पेरणाऱ्या इराणच्या अनेक नौका नष्ट केल्या आहेत. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ केलेल्या कारवाईचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. 10 मार्च रोजी अमेरिकन सैन्याने इराणच्या 16 ‘माइनलेयर्स’ (सुरुंग पेरणारी जहाजे) लक्ष्य करून ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली, अशी माहिती सेंट्रल कमांडने दिली. दरम्यान, या कारवाईचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. इराणकडून आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीत अडथळा निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
यूएस सैन्याने 10 मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील 16 मायनलेयर्ससह अनेक इराणी नौदल जहाजे नष्ट केली. pic.twitter.com/371unKYiJs
– यूएस सेंट्रल कमांड (@CENTCOM) 10 मार्च 2026
दरम्यान, या कारवाईबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर माहिती दिली. मात्र त्यांच्या आणि सेंट्रल कमांडने दिलेल्या आकडेवारीत तफावत दिसून आला. सेंट्रल कमांडने 16 इराणी जहाजं नष्ट केल्याचे म्हटले, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 इराणी जहाजं नष्ट केल्याचे म्हटले आहे.
जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत एकही सुरुंग पेरला असेल, तर तो तात्काळ हटवण्यात यावा. तसे न झाल्यास, इराणला अशा लष्करी परिणामांना सामोरे जावे लागेल जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नाहीत, असा इशाराही ट्रम्प यांनी यावेळी दिला.

होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाची का?
– जगातील एकूण खनिज तेलाच्या व्यापारापैकी सुमारे 20 टक्के व्यापार याच मार्गावरून होतो.
– हे ओमान आणि इराणच्या दरम्यान असून अत्यंत अरुंद पण महत्त्वाचे जलक्षेत्र आहे.
– इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) यापूर्वीच या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.
– इराणने या भागात आधीच काही सुरुंग पेरले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसराला आता ‘हाय-रिस्क’ झोन घोषित करण्यात आले असून जागतिक तेल पुरवठ्यावर याचे मोठे परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.