तानसा अभयारण्यातील सगळे पाणवठे कोरडेठाक; पशुपक्ष्यांची पाण्याविना तडफड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मार्च महिना सुरू होऊन जेमतेम दहा दिवस उलटत नाही तोच उन्हाचा भयंकर तडाखा बसू लागला आहे. हंडाभर पाण्यासाठी माता-भगिनींची मैलोन्‌मैल पायपीट सुरू झाली असून या पाणीटंचाईची झळ माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागली आहे. तानसा अभयारण्यामधील पाणवटे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांची पाण्याविना तडफड सुरू असून अनेक प्राणी पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. रानडुक्कर, बिबट्या हे हिंस्त्र प्राणी तर शहरी भागात घुसून हल्ले करू लागले आहेत.

शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य हे पर्यटकांसाठी महत्त्वाचे केंद्र असून तेथे अनेक दुर्मिळ पशुपक्षी आहेत. दाट जंगलामध्ये अनेक ओहळ असले तरी कडक उन्हाळ्यामुळे हे ओहळ तसेच पाणवठे कोरडे पडले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून फेब्रुवारी महिना सुरू होताच तानसा अभयारण्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे पशुपक्ष्यांना प्यायला पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. अभयारण्यातील पाणवठ्यांमध्ये एक थेंबही पाणी नसल्यामुळे येथील प्राणी मानवी वस्त्यांकडे जात असून आतापर्यंत या प्राण्यांनी हल्लेदेखील केले आहेत.

तापमान वाढीचा पर्यावरणावर परिणाम

मोठ्या प्रमाणात केली जाणारी जंगलतोड, ओसाड पडलेले रानमाळ, वणवे व त्यामुळे तापमानात झालेली वाढ याचा परिणाम पर्यावरणावर जाणवू लागला आहे. तानसा व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणवठे होते. ते आज पाहवयास मिळत नाहीत. पाण्याची पातळी खोलवर जात असल्याचा हा परिणाम आहे. जंगलातील सर्वच पाणवठे नाहीसे होत असून त्यासाठी पावसाळ्यातील पाणी जमिनीत मुरवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या काही महिन्यांत शहापूर तालुक्यातील भोसपाडा, कसारा, वाशाळा, दहिगाव, बेलवड येथे बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांच्या कोंबड्या, बकऱ्या फस्त झाल्या आहेत. बिबट्या व तरससारखे हिंस्त्र प्राणी जंगलाजवळ वास्तव्य करणाऱ्या वस्तीकडे फिरकू लागल्याने स्थानिक रहिवाशांना घराबाहेर फिरणे मुश्कील झाले आहे.

वनातील पाणवठे मार्चच्या पहिल्या आठवड्यातच कोरडेठाण पडल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांपासून ही स्थिती असून भविष्यात मात्र याचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे.

Comments are closed.