Weather Update – मुंबई महानगरात पाऱ्याचा ‘ताप’ कायम; ठाणे, पालघर, रायगडला येलो अलर्ट
उत्तर कोकणातील उष्म्याची तीव्रता ‘जैसे थे’ असून मुंबई महानगरालाही बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी उष्णतेच्या झळा बसत आहेत. मुंबई शहरासह आसपासच्या पालघर, ठाणे, रायगडमध्ये सकाळपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभरात पारा पुन्हा 37 अंशांच्या विक्रमी पातळीवर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याच अनुषंगाने ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला तापमानवाढीचा ‘येलो अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
तापमानवाढीच्या दृष्टीने मुंबईकरांसाठी आजचा दिवसही चिंता वाढवणारा ठरणार आहे. शहरात तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेसह हवेतील आर्द्रता वाढल्याने वातावरणात उकाडा आणि दमटपणाही वाढणार असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
एकीकडे सुर्य कोपला असतानाच मुंबईत प्रदूषणाची पातळी पुन्हा चिंताजनक बनण्याची चिन्हे आहेत. दाट, सततच्या धुरक्यामुळे हवेची गुणवत्ता चिंताजनक बनत आहे. त्यामुळे शहराच्या काही भागांतील दृश्यमानता कमी झाली आहे. जागोजागी सुरु असलेले बांधकाम आणि स्थिर वाऱ्याच्या परिस्थितीमुळे मुंबई शहराला प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
वाढत्या उष्णतेचा आणि आर्द्रतेचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुपारच्या वेळी उन्हात जास्त काळ राहणे टाळा, भरपूर पाणी प्या, पचनास हलके असलेले अन्नपदार्थ आणि ताजी फळे खाण्यास प्राधान्य द्या, अशा खबरदारीच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
मंगळवारी 12 मार्च रोजी सांताक्रूझ येथील तापमान मोजणी केंद्रावर 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मार्च 2021 नंतर शहरातील हा सर्वाधिक पारा आहे. कुलाबा वेधशाळेत 35.4 अंश तापमानाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा 4.3 अंश सेल्सिअस जास्त आहे.
Comments are closed.