प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची भयंकर हत्या; झाडाझुडपातील प्लॉटवर सापडला मृतदेह, कुटुंबाला वेगळाच संशय

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आकाशच्या मृत्यूची बातमी: सोशल मीडिया विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय युट्यूबर आणि  इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर पुष्पेंद्र उर्फ आकाश (वय वर्ष 31) याचं निधन झालं आहे. तरुणाचा मृतदेह पूर्व दिल्लीतील मंडावली परिसरातील  आनंद विहार भागातील एका अज्ञात रिकाम्या जागी सापडला.  शनिवारपासून आकाश हा घरातून बेपत्ता होता. दरम्यान, सोमवारी त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.  आकाशच्या कुटुंबियांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. आकाशचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

आकाशच्या कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.  कुटुंबाने पोलिसांवर निष्काळजीपणा तसेच कॉल डिटेल्स(सीडीआर) मिळवण्यासाठी एका कॉन्स्टेबलने 10,000 रुपयांची लाच घेतल्याचे गंभीर आरोप केले आहेत. मुळचा अलिगढचा रहिवासी असलेला आकाश मंडावली  येथे त्याचे  आई – वडील, पत्नी आणि आपल्या 3 वर्षांच्या मुलीसह राहत होता.   तो स्टायलिंग नावाचा कपड्यांचा शोरुम चालवत होता. तो सोशल मीडियावर फॅशन व्हिडिओद्वारे कपड्यांची ब्रॅण्डिंग करत होता.

शनिवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आकाश  दीड लाख रुपये रोख घेऊन गांधी नगर मार्केटला निघाला होता. दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान त्याचा फोन स्वीच ऑफ लागत होता.  कुटुंबाने तातडीने मंडावली पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आकाश बेपत्ता झाला असल्याची तक्रार दाखल केली.  आकाशचा भाऊ सत्येंद्रने पोलिसांवर गंभीर आरोप केले. शोधकार्यात तातडीने दखल न घेतल्यानं भावाचा मृत्यू झाला, असं त्यानं म्हटलं आहे.

सोमवारी सायंकाळी जेव्हा कुटुंब आले तेव्हा त्यांना आकाशचा मृतदेह डीडीएतील एका झाडाझुडपांनी वेढलेला प्लॉटमध्ये आढळला.  त्याचा मोबाईलही मृतदेहाच्या शेजारी सापडला. कुटुंबियांनी थेट आरोप केला की,  आकाशची सोन्याची चैन आणि दीड लाख रुपये गायब आहेत.  त्यांना असा संशय आहे की, कुणीतरी त्याच्याकडील पैसे लुटले तसेच विषारी पदार्थ खायला देऊन हत्या केली.  पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

पूर्व दिल्लीतील डीसीपी राजीव कुमार यांनी सांगितले की, ‘प्राथमिक तपास आणि मृतदेहाच्या स्थितीवरुन ही हत्या असल्याचे स्पष्ट होत नाही.   पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.  सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.  लाचखोरीच्या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल’. या  घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

आणखी वाचा

Comments are closed.