अमेरिकेचे 6 अणुबॉम्ब अजूनही बेपत्ता; युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढली चिंता
मध्यपूर्वेत तणाव वाढत असताना अमेरिकेच्या अण्वस्त्र सुरक्षेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालांनुसार, अमेरिकेच्या सैन्य दलाने गेल्या अनेक दशकांत झालेल्या दुर्घटनांमध्ये 6 अणुबॉम्ब कायमचे गमावले असून ते आजतागायत सापडलेले नाहीत. सध्या इराणसोबत तणाव वाढत असताना ही बाब जागतिक सुरक्षेसाठी चिंतेची ठरली आहे.
अण्वस्त्रांशी संबंधित अपघात, जसे की अणुबॉम्ब हरवणे, अपघाताने खाली पडणे किंवा स्फोट होणे, अशा घटनांना अमेरिकन सैन्य भाषेत ब्रोकन अॅरो असे म्हटले जाते. आतापर्यंत अशा 32 घटनांची नोंद झाली आहे. यापैकी काही प्रकरणांमध्ये शस्त्रे पुन्हा सापडली, मात्र 6 अण्वस्त्रे आजही बेपत्ता आहेत.
तज्ज्ञांच्या मते, या प्रत्येक अणुबॉम्बची शक्ती एखादे संपूर्ण शहर नष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर कठोर कारवाईची धमकी दिल्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर अशा हरवलेल्या अण्वस्त्रांपैकी एक जरी चुकीच्या हातात गेले तर त्याचे परिणाम अत्यंत विनाशकारी ठरू शकतात.
तज्ज्ञांचे मत आहे की, जरी अमेरिकेने आणि इस्त्रायलने पूर्वी इराणच्या अणुसाठ्यांवर हल्ले केले असले तरी, इराण मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये अणुकार्यक्रम पुन्हा सुरु करु शकतो. काही विश्लेषकांच्या मते, हा संघर्ष वाढला तर इराणही दक्षिण कोरीया प्रमाणे अणुशक्ती मिळवण्याचा मार्ग स्विकारु शकतो. जागतिक सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, हरवलेली अण्वस्त्रे आणि वाढता मध्यपूर्वेतील तणाव यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेचे धोके अधिक गंभीर बनू शकतात.
Comments are closed.