मराठी इन्फ्लूएन्सरचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन, राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
काही दिवसांपूर्वीच मराठमोळ्या इन्फ्लूएन्सर प्रथमेश कदमचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत अनेकांना धक्का बसला होता. आता आणखी एका लोकप्रिय रीलस्टारच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. आपल्या विनोदी आणि देशी शैलीने लाखो लोकांना मोहीत करणारा मराठी कंटेंट क्रिएटर अरुण तुपे याचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्यांच्या अचानक निधनाने त्याचे चाहते आणि कुटुंबाला धक्का बसला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, अरुण तुपे याचे 10 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील त्याच्या घरी निधन झाले.
अरुण त्यांच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळल्याची माहिती आहे, त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरुवातीच्या अहवालांमध्ये त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात होते. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणला अपस्माराचा (फिट) आजार होता. मात्र, अरुण तुपेने 24 तासांपूर्वीच एक रील शेअर केली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अरुण तुपे हा मराठी सोशल मीडिया क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव होते. इन्स्टाग्रामवर त्याला ‘कोण_अरुणतुपे’ म्हणून ओळखले जात होते. आणि त्याचे 1,85,000 हून अधिक फॉलोअर्स होते. अरुण त्याच्या छोट्या विनोदी व्हिडिओंसाठी आणि दैनंदिन जीवनाबद्दलच्या मजेदार स्केचेससाठी प्रसिद्ध होता.
Comments are closed.