LPG गॅसचा तुटवडा, ग्राहकांची इंडक्शन स्टोव्हकडे धाव; ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि दुकानात ग्राहकांची झुंबड

देशात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या टंचाईमुळे आणि पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे इंडक्शन कुकटॉपच्या विक्रीत अचानक मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अनेक नागरिक तसेच हॉटेल व्यवसायिक पर्यायी स्वयंपाकाच्या साधनांच्या शोधात असल्याने दुकाने आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर इंडक्शन स्टोव्हची खरेदी झपाट्याने वाढली आहे.

स्थानिक विक्रेते तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन यांनीही मागणी वाढल्याचे सांगितले आहे. काही ग्राहक एलपीजीच्या तुटवड्यामुळे तातडीने इंडक्शन स्टोव्ह खरेदी करत आहेत, तर काही जण भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आधीच खरेदी करत आहेत.

फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार ते पाच दिवसांत इंडक्शन कुकटॉपच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून मागील तीन ते चार आठवड्यांच्या तुलनेत विक्री जवळपास तीन पट वाढली आहे. दिल्ली, कोलकाता आणि उत्तर प्रदेश या भागांमध्ये मागणी विशेषतः जास्त वाढल्याचे फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने सांगितले.

फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे इंडक्शन कुकटॉप हा केवळ “किचन अपग्रेड” न राहता अनेक कुटुंबांसाठी “जगण्यासाठीची गरज” बनला आहे. एलपीजीच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर इंडक्शन स्टोव्हकडे वळत आहेत.

दरम्यान, अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, अॅमेझॉनच्या ऑनलाइन साइटवर मागील 24 तासांत इंडक्शन कुकटॉपची मागणी सामान्य दिवसांच्या तुलनेत तब्बल 20 पट वाढली आहे.

मुंबईतील अनेक दुकानदारांनीही अशाच प्रकारचा ट्रेंड दिसत असल्याचे सांगितले आहे. एलपीजी सिलिंडरच्या टंचाईमुळे इंडक्शन स्टोव्हच्या खरेदीबरोबरच चौकशीही वाढली आहे.

ठाण्यातील मानपाडा येथील गोल्डन स्टील अँड अप्लायन्सेस दुकानाचे व्यवस्थापक सागर सात्रा यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात इंडक्शन स्टोव्हच्या मागणीत पाच पट वाढ झाली आहे. पूर्वी दररोज 5 ते 7 गॅस स्टोव्ह विकले जात होते, तर आठवड्यात फक्त 2 ते 3 इंडक्शन स्टोव्ह विकले जात होते. मात्र गेल्या आठवड्यात गॅस स्टोव्हची विक्री जवळपास तशीच राहिली असली तरी इंडक्शन स्टोव्हची विक्री आठवड्यात 10 पर्यंत वाढली आहे. सात्रा म्हणाले की, ही वाढ थेट एलपीजी टंचाईमुळे झाली आहे का हे निश्चित सांगता येत नसले तरी मागणीमध्ये स्पष्ट वाढ दिसत आहे.

मुंबईतील काळबादेवी येथील अटलांटा एंटरप्रायझेस दुकानातील एका विक्रेत्यानेही मागणी वाढल्याचे सांगितले. साधारणपणे दिवसभरात इंडक्शन स्टोव्हबाबत एक-दोन चौकशा येत असतात, मात्र मंगळवारी चार ग्राहकांनी थेट दुकानात येऊन इंडक्शन स्टोव्ह खरेदी केले. एलपीजी सिलिंडरच्या संकटामुळे लोकांकडे पर्याय नसल्याने ते पर्यायी साधनांकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे की एलपीजी टंचाई पुढील आठवड्यातही कायम राहिल्यास इंडक्शन कुकटॉपच्या विक्रीत आणखी वाढ होऊ शकते.

मालाडमधील बिग बी अप्लायन्सेस या दुकानाचे गोवर्धन त्रिवेदी यांनी सांगितले की, व्यावसायिक एलपीजीच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढल्यामुळे काही हॉटेल व्यवसायिकांनीही इंडक्शन स्टोव्हचा पर्याय तपासण्यास सुरुवात केली आहे.

त्रिवेदी म्हणाले की, विक्रीत अजून मोठी वाढ दिसली नसली तरी मंगळवारी काही हॉटेल व्यावसायिकांनी मोठ्या इंडक्शन स्टोव्हबाबत चौकशी केली. व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे अनेक हॉटेल व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायाबाबत चिंता वाटत आहे आणि ते पर्यायी साधनांचा विचार करत आहेत.

गॅस स्टोव्हच्या तुलनेत इंडक्शन कुकटॉपमध्ये अन्न शिजवण्यासाठी थेट आग वापरली जात नाही. त्याऐवजी इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून भांडी गरम केली जातात, त्यामुळे एलपीजी सिलिंडरची गरज लागत नाही.

Comments are closed.