पाकिस्तान क्रिकेट संघाची पुन्हा एकदा भयंकर नाचक्की; 27 वर्षांपूर्वीचा लाजिरवाणा विक्रम मोडीत

पाकिस्तान क्रिकेट संघाने पुन्हा एकदा तीच चूक केली आहे, जी ते गेल्या अनेक काळापासून करत आले आहेत. टी20 विश्वचषक 2026 (Icc T20 international world cup 2026) स्पर्धेमध्ये पाकिस्तानी संघाचा प्रवास सुपर 8 च्या पुढे जाऊ शकला नव्हता आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना संघाने पुन्हा एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आणि संघाने आपला 27 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, पाकिस्तानी संघ सध्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर ( Odi series between PAKvs BAN) आहे. या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला पाकिस्तानचा संघ केवळ 114 धावांवर अष्टपैलू बाद झाला. विशेष म्हणजे, हा 50 षटकांचा एकदिवसीय सामना होता, टी20 नाही; तरीही पाकिस्तानचा संघ पूर्ण 50 षटके खेळू शकला नाही आणि 30.4 षटकांमध्येच तंबूत परतला.
शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने केलेल्या या 114 धावा, बांगलादेशविरुद्धची त्यांची आजवरची सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी 1999 मध्ये पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध 161 धावा केल्या होत्या, परंतु आता तो विक्रमही मोडला गेला आहे. मालिकेची सुरुवातच इतकी धक्कादायक झाल्यामुळे आता उरलेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तान काय कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर, सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली होती, तर शेवटच्या विकेटसाठी 32 धावांची भर पडली. जर या दोन भागीदारी झाल्या नसत्या, तर पाकिस्तानची स्थिती आणखी भयानक असती. संघासाठी फहीम अशरफने सर्वाधिक 37 धावा केल्या, तर साहिबजादा फरहानने 27 धावांचे योगदान दिले. बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानने पूर्णपणे शरणागती पत्करली. बांगलादेशच्या नाहिद राणाने घातक गोलंदाजी करत 7 षटकांमध्ये केवळ 24 धावा देऊन पाकिस्तानच्या 5 फलंदाजांना बाद केले. पाकिस्तानच्या पहिल्या 5 ही विकेट्स एकट्या नाहिदनेच घेतल्या होत्या. त्यानंतर मेहंदी हसन मिराजने 3 विकेट्स घेतल्या, तर तस्कीन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Comments are closed.