IPL 2026: आयपीएलच्या केवळ 20 सामन्यांचेच वेळापत्रक का जाहीर झाले? बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (11 मार्च) आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकाची घोषणा केली. मात्र, हे वेळापत्रक संपूर्ण हंगामासाठी नसून केवळ सुरुवातीच्या 20 सामन्यांसाठीच आहे. बीसीसीआयने वेळापत्रक दोन टप्प्यांत जाहीर करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट केले आहे.
बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकांमुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचा फक्त पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 28 मार्च ते 12 एप्रिल 2026 या कालावधीत सामने खेळवले जातील. देशातील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने, या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल.
निवडणुका आणि खेळाडूंची सुरक्षा या दोन्ही गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या हंगामाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. मात्र, या मैदानात सामने खेळवण्यासाठी तज्ज्ञ समितीची (Expert Committee) मंजुरी मिळणे आवश्यक आहे. समितीच्या परवानगीनंतरच बंगळुरूमधील सामन्यांचे भवितव्य स्पष्ट होईल.
Comments are closed.