IPL 2026: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यावर टांगती तलवार! बंगळुरूमधील सामन्यांबाबत BCCI ने दिला मोठा इशारा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी (11 मार्च) आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 20 सामने खेळवले जाणार असून स्पर्धेची सुरुवात 28 मार्च, शनिवारपासून होईल. मात्र, हंगामाचा पहिलाच सामना जो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात होणार आहे, त्यावर आता संकटाचे ढग जमा झाले आहेत.
बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यातील हा सलामीचा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. परंतु, बीसीसीआयने वेळापत्रकासोबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात एक महत्त्वाचा ‘नोट’ (सूचना) जोडली आहे. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, बंगळुरूमधील सामन्यांचे आयोजन हे कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या मंजुरीवर अवलंबून असेल.
बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ही तज्ज्ञ समिती 13 मार्च 2026 रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमची पाहणी करेल आणि एक महत्त्वाची बैठक घेणार आहे. या दरम्यान, आयपीएल सामन्यांच्या आयोजनासाठी स्टेडियम किती सज्ज आहे, याचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी असणाऱ्या व्यवस्थेची तालीम (Mock Drill) केली जाईल. या समितीच्या अहवालानंतरच तिथे सामने होणार की नाही, हे स्पष्ट होईल.
जर स्टेडियमला सामने आयोजित करण्याची परवानगी मिळाली, तर आरसीबी (RCB) संघ बंगळुरूमध्ये आपले 5 घरेलू सामने खेळेल. मात्र, उर्वरित 2 घरेलू सामने रायपूरमध्ये आयोजित केले जातील. आता 13 मार्चच्या बैठकीत स्टेडियमला हिरवा कंदील मिळतो की नाही, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.