अक्षर पटेलचा पत्ता कट! भारतीय दिग्गजाने कामगिरीच्या जोरावर टी20 वर्ल्ड कप 2026साठी निवडली परफेक्ट प्लेइंग इलेव्हन

आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ आता संपला आहे, पण त्याची क्रेझ क्रिकेट प्रेमींच्या मनातून अजूनही उतरलेली नाही. बहुधा हीच गोष्ट लक्षात घेऊन भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी एक मनोरंजक संघ तयार केला आहे. त्यांनी टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सहभागी झालेल्या २० संघांतील खेळाडूंचा समावेश करून या स्पर्धेसाठी एक ‘परफेक्ट प्लेइंग इलेव्हन’ निवडली आहे. या संघाचे नेतृत्व त्यांनी मिशेल सॅन्टनरकडे सोपवले आहे. सँटनरच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडचा संघ स्पर्धेच्या फायनलपर्यंत पोहोचला होता, मात्र अंतिम सामन्यात त्यांना भारतीय संघावर मात करता आली नाही आणि पराभवाचा सामना करावा लागला.

​६६ वर्षीय माजी क्रिकेटपटूच्या या संघातून भारतीय उपकर्णधार अक्षर पटेलचे नाव गायब असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धेत पटेलने शानदार कामगिरी केली होती, तरीही त्याचे नाव या यादीत नसल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. इतकेच नाही तर, त्यांनी स्पर्धेत धुमाकूळ घालणारा स्फोटक सलामीवीर फिन ऍलनला देखील संधी दिलेली नाही. ॲलनने आक्रमक फलंदाजी करत या टी२० वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक झळकावले होते.

​श्रीकांत यांनी आपल्या संघात सलामीवीर म्हणून संजू सॅमसन आणि टिम सेफर्टला संधी दिली आहे. तर मधल्या फळीची जबाबदारी त्यांनी ईशान किशन आणि शिमरॉन हेटमायरच्या खांद्यावर सोपवली आहे. संघात त्यांनी एकूण चार अष्टपैलू (ऑलराउंडर) खेळाडू निवडले आहेत, ज्यामध्ये शिवम दुबे, हार्दिक पांड्या, विल जॅक आणि मिशेल सॅन्टनर यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी लुंगी एन्गिडी आणि जसप्रीत बुमराहची, तर फिरकीपटू म्हणून आदिल रशीदची निवड केली आहे. तसेच, १२ वा खेळाडू म्हणून त्यांनी जेसन धारकला संधी दिली आहे.

Comments are closed.