मराठी भाषा भवन फेब्रुवारीत सुरू होणार
मुंबईतील मराठी भाषा भवनाच्या काही भागाचे फेब्रुवारी 2027 पर्यंत लोकार्पण होईल. याशिवाय लंडन येथे छत्रपती शिवरायांच्या नावाने जगातले मातृभाषेतले पहिले वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून पाच कोटींचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, परंतु मुंबईतील मराठी भाषा भवनाचे काम अद्याप रखडलेले आहे. याबाबत विधान परिषदेत आमदार भाई जगताप यांनी नियम 93 अंतर्गत सूचना मांडली होती. त्यावर मंत्री उदय सामंत म्हणाले, 2013 साली मराठी भाषा भवनाची संकल्पना पुढे आली. पुढे मराठी भाषा भवनासाठी मुंबईत धोबी तलावची जागा निवडली. त्यावेळी 11 कोटी मंजूर करण्यात आले. आता मराठी भाषा भवनासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही जमीन समुद्राच्या समांतर असल्याने पावसाळ्यात काम करणे अवघड झाले होते. त्यामुळे या कामासाठी उशीर झाला. परंतु फेब्रुवारी 2027 पर्यंत मराठी भाषा भवनाच्या काही भागाचे लोकार्पण करण्यात येईल.’ तसेच साहित्यिकांच्या मागणीवरून ऐरोलीत मराठीचे दुसरे भाषा उपकेंद्र तयार होत असून त्यासाठी 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.