चॅम्पियन ट्रॉफी मंदिरात नेल्याबद्दल टीका
जय शाह यांच्यावर विरोधी नेत्यांनी केले आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंनी त्या चषकासह अहमदाबादच्या एका मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नवा वाद निर्माण केला आहे. या खेळाडूंसमवेत आयसीसीचे अध्यक्ष जय शाह हे देखील होते. त्यांनीच खेळाडूंना मंदिरात नेले होते, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
काँग्रेसचे खासदार तारीक अन्वर यांनी शाह यांच्यावर टीका केली. चषक अशा प्रकारे मंदिरात नेणे ही आपली परंपरा नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. या टिप्पणीला भारतीय जनता पक्षानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. विजेत्या भारतीय संघावर अशी टीका करताना तारीक अन्वर यांना लाज वाटावयास हवी होती. देवाचे आशीर्वाद घेणे, ही आपली पूर्वापारची परंपरा आहे, असा प्रतिटोला त्यांनी दिला.
हनुमान मंदिरात जाऊन दर्शन
दणक्यात विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी अहमदाबाद येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. या घटनेचे वृत्त आणि छायाचित्रेही प्रसिद्ध झाली. या घटनेवर प्रथम तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकात्मक संदेशावर भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे महासचिव निखील आनंद यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. कीर्ती आझाद आणि तारीक अन्वर हे मतांच्या राजकारणासाठी अशी टीका करीत आहेत. वास्तविक मंदिरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेणे ही आपली परंपरा आहे, असे प्रतिपादन निखील आनंद यांनी केले. विजय मिळाल्यानंतर जर कोणी चषक हृदयाशी धरला आणि जर कोणी मंदिरात जाऊन परमेश्वराचे आशीर्वाद घेतले, तर कोणी या कृतींवर आक्षेप का घ्यावा, असा प्रतिप्रश्न हुसेन यांनी बुधवारी केला.
सर्वसामान्यांच्याही प्रतिक्रिया
या देवदर्शनाच्या घटनेवर सर्वसामान्यांनाही सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बहुतेकांनी भारतीय संघाच्या आणि जय शाह यांच्या कृतीचे समर्थन केल्याचे दिसून येते. मोजक्या काही लोकांनी विरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तथापि, एकंदर लोकांनी विरोधकांची टीका अनाठायी असल्याचे मत दिले.
Comments are closed.