अंदाजाने चिंता वाढवली, महाराष्ट्रात उकाडा भयंकर… पाऊस यंदा कमी होणार!
मुंबईसह महाराष्ट्राचा ग्रामीण भाग उष्णतेच्या तीव्र लाटेची धग सोसत असतानाच मान्सूनच्या पहिल्या अंदाजाने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. राज्यातील उकाडा येत्या काळात आणखी भयंकर बनण्याची चिन्हे आहेत. त्यात मान्सूनदेखील घोर निराशा करणार आहे. यंदाच्या हंगामात पावसाचे प्रमाण कमी असेल. मान्सूनवर ‘अल निनो’चा प्रतिकूल परिणाम होईल, असा अंदाज जागतिक हवामान संघटनेने वर्तवला आहे.
जागतिक हवामान संघटनेने बुधवारी मान्सूनबाबत पहिला अंदाज वर्तवला. त्यानुसार चालू वर्षाच्या उत्तरार्धात ‘अल निनो’ सक्रीय होणार आहे. त्याचा मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत जगभरात जमिनीवरील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची चिन्हे आहेत. विविध हवामान घटकांमुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे.
- राज्यात उकाडा भयंकर वाढणार असल्यामुळे अनेक भागांत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होऊ शकते, अशी भीती तज्ञ मंडळींनी व्यक्त केली आहे. कमी पावसामुळे दुष्काळाचे संकट गहिरे बनण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. या शक्यतेने बळीराजाची चिंता कमालीची वाढली आहे.
मुंबईत दोन दिवसांपासून उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. पारा 42 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हाचे चटके मुंबईकरांना बसत आहेत. यात बांधकाम कामगारांची तर अधिकच होरपळ होत आहे.
Comments are closed.