अडीच दिवसांत घरगुती सिलिंडर मिळणार आहेत.

एलपीजी गॅस सिलिंडर्स टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण : साठेबाजी न करण्याचे आवाहन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतही त्याला अपवाद नाही. आखाती देशांमधून होणारा गॅस पुरवठा थांबल्यामुळे देशात गॅस संकट निर्माण झाले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे रेस्टॉरंट उद्योगाला मोठे नुकसान होत आहे. तसेच घरगुती सिलिंडरच्या बाबतीतही सर्वसामान्य लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचदरम्यान, गॅस डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनने देशात घरगुती गॅसची कमतरता नसल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारनेही स्वयंपाकाचा गॅस बुकिंगनंतर अडीच दिवसांपूर्वी घरपोच उपलब्ध होईल, असे आश्वासन दिले आहे. या घोषणेच्या माध्यमातून सरकारने एलपीजीबाबत अनेक गैरसमज दूर करतानाच साठेबाजी न करण्याचे आवाहनही केले आहे.

देशातील गॅस टंचाईचे स्वरूप आणि सरकारच्या प्रयत्नांबद्दल सरकारने बुधवारी सविस्तर स्पष्टीकरण दिले. एलएनजीचे दोन कार्गो भारतात येत असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले. पुरवठा सुरळीत सुरू असल्याने बुकिंगनंतर अडीच दिवसांत घरगुती  सिलिंडर उपलब्ध होतील, असे त्यांनी जाहीर केले. तसेच त्यांनी लोकांना घाबरू नका आणि सिलिंडर साठवून ठेवू नका असा सल्ला दिला. घरगुती एलपीजीसाठी सामान्य वितरणचक्र सुमारे अडीच दिवसात येणार असल्याने ग्राहकांनी सिलिंडर बुक करण्यासाठी घाई करू नये, असे त्या म्हणाल्या.

इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक अस्थिरता सुरू आहे. देशाच्या अनेक भागात एलपीजीचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत. गॅस सिलिंडर बुकिंग सिस्टीममध्ये बदल करण्यात आले असून त्यामध्ये पहिल्या सिलिंडरनंतर 25 दिवसांनी दुसरा सिलिंडर देण्याची तरतूद समाविष्ट आहे. तरीही गॅस बुकिंग आणि गॅसच्या पुरवठ्याबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडर्स मिळविण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्याचे आणि काळाबाजार करून सिलिंडर्स मिळविले जात असल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत.

समस्या निराकरणासाठी सरकार सज्ज

देशाचा दररोजचा नैसर्गिक वायूचा वापर अंदाजे 189 दशलक्ष एमएससीएमडी आहे. यापैकी 97.5 एमएससीएमडी देशांतर्गत उत्पादित केला जातो आणि उर्वरित आयात केला जातो. यापैकी 47.4 एमएससीएमडी आयातीवर परिणाम झाला आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी पर्यायी स्त्राsतांकडून खरेदी केली जात आहे. गॅस कंपन्यांनी नवीन स्त्राsतांकडून कार्गो खरेदी केले आहेत. देशात दोन एलएनजी कार्गो येत आहेत, असे सरकारने सांगितले.

रिफायनरीज पूर्ण क्षमतेने कार्यरत

भारत 40 देशांमधून कच्चे तेल आयात करतो. आमच्या सरकारी मालकीच्या कंपन्यांनी विविध स्त्राsतांकडून तेल खरेदी केले आहे. परिणामी, आपल्या कच्च्या तेलाच्या अंदाजे 70 टक्के भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीशिवाय इतर मार्गांनी येतो. पूर्वी हा आकडा 55 टक्के होता. दोन कार्गो आधीच भारतासाठी रवाना झाले आहेत आणि काही दिवसांत पोहोचतील. रिफायनरीज पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, तर काही 100 टक्केपेक्षा जास्त क्षमतेने कार्यरत आहेत, असे पेट्रोलियम मंत्रालयाने बुधवारी सांगितले.

Comments are closed.