हर्षित राणा यांच्या इच्छामरणाला परवानगी
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : न्यायमूर्ती निवाडा देताना झाले भावुक, डोळे पाणावले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
साधारणत: 12 वर्षांपूर्वी चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्याने बेशुद्धावस्थेत गेलेल्या आणि आजपर्यंत त्याच अवस्थेत राहिलेल्या हर्षित राणा नामक युवकाला ‘निष्क्रीय दयामृत्यू’ देण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. ही मागणी हर्षित राणा याच्या माता-पित्यांनी केली होती. त्यांची याचिका मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने रुग्णालयाला दयामृत्यू देण्याची अनुमती काही सूचनांसह दिली आहे.
न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांनी हा निर्णय बुधवारी दिला. हा निर्णय देताना न्या. पारदीवाला यांचे डोळे पाणावले होते. हर्षित राणा हा सध्या 32 वर्षांच्या असून त्याला अपघात झाला, तेव्हा तो जवळपास 20 वर्षांचा होता. त्याला मृत्यू देताना तो सन्मानपूर्वक दिला जाईल, याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. राणा सध्या लाईफ सपोर्टवर असून आता न्यायालयाच्या आदेशानंतर त्याचा लाईफ सपोर्ट काढून घेतला जाईल.
गाझियाबाद येथील घटना
हर्षित राणा याचा अपघात गाझियाबाद येथे 2013 मध्ये घडला होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. त्याला आता दयामृत्यू देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका त्याच्या माता-पित्यांनी सादर केली होती. त्याच्यावर दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गेला 12 वर्षांहून अधिक काळ तो बेशुद्धावस्थेतच आहे. दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. निर्णय देण्यापूर्वी न्या. पारदीवाला आणि न्या. विश्वनाथन यांनी हर्षित राणा याच्या माता-पित्यांची व्यक्तीश: भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा करुनच न्यायालयाने अत्यंत व्यथित मन:स्थितीत दयामृत्यूचा हा निर्णय दिला.
निष्क्रीय दयामृत्यू म्हणजे काय…
जी व्यक्ती बेशुद्धावस्थेत असून ती शुद्धीत येण्याची, किंवा तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही, अशा व्यक्तीचे वैद्यकीय उपचार बंद करणे आणि तिचा लाईफ सपोर्ट काढून घेऊन तिला नैसर्गिक मृत्यूच्या आधीन करणे, या प्रक्रियेला ‘निष्क्रीय दयामृत्यू’ असे संबोधले जाते. सर्वोच्च न्यायालयाने भारतात अशा निष्क्रीय दयामृत्यूला 2011 च्या निर्णयानुसार अनुमती दिली आहे. मात्र, भारतात ‘सक्रीय दयामृत्यू’ला अनुमती नाही. सक्रीय दयामृत्यू याचा अर्थ बरे न होण्याच्या अवस्थेत असणाऱ्या रुग्णाला एखादे इंजेक्शन देऊन किंवा अन्य मार्गाने कृत्रिमरित्या त्याचा मृत्यू घडविणे असा आहे. 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अरुणा शानबाग प्रकरणात या दोन दयामृत्यूंमधील अंतर आणि कायदेशीरत्वातील अंतर स्पष्ट केले होते. ‘निष्क्रीय दयामृत्यू’ हा सुद्धा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्थितीमध्येच देण्यात यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 2011 मध्ये अरुणा शानबाग यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रीय दयामृत्यूची अनुमती नाकारली होती. कारण अनेक दशके बेशुद्धावस्थेत असलेल्या अरुणा शानबाग यांची शुश्रूषा करण्यास रुग्णालयातील कर्मचारी वर्गाची मान्यता होती. कर्मचारी वर्गाचा दयामृत्यूला विरोध होता. त्यामुळे अनुमती नाकारली गेली.
2023 मध्ये प्रक्रिया अधिक व्यवहार्य
2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रीय दयामृत्यूची प्रक्रिया अधिक व्यवहार्य केली आहे. असा मृत्यू देण्यापूर्वी रुग्णालयाने आपल्या डॉक्टरांचे प्राथमिक मंडळ स्थापन करायचे असते. या मंडळाने रुग्णाच्या स्थितीसंबंधी अहवाल सादर करायचा असतो. नंतर जिल्हा पातळीवर डॉक्टरांची आणखी एक समिती स्थापन व्हावी लागते. या समितीनेही दयामृत्यू देण्याची सूचना केली, तरच असा मृत्यू आसन्नमरण अवस्थेतील रुग्णाला देता येतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
हर्षित राणाला दिला जाणार दयामृत्यू
ड 12 वर्षांपूर्वी चौथ्या मजल्यावरुन पडल्याने हर्षित राणा बेशुद्धावस्थेत
ड 2013 मध्ये हर्षित राणा याचा गाझियाबाद येथे घडला होता अपघात
ड माता-पित्यांनी हर्षितच्या दयामृत्यूसाठी सादर केली होती याचिका
ड वैद्यकीय मंडळाचा अहवाल व माता-पित्यांच्या इच्छेमुळे दिला निर्णय
Comments are closed.