धोनीने युवराजला टीम इंडियातून काढले? माजी संघनिवड अधिकाऱ्याने सांगितले यामागचे सत्य

भारतीय क्रिकेट संघाचे विश्वविजेते एमएस धोनी आणि युवराज सिंग हे महत्वाचे खेळाडू राहिले आहेत. त्यांनी २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार तर युवराज हा स्टार अष्टपैलू राहिला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी अनेकदा धोनीवर त्यांचा मुलगा युवराजची कारकिर्द लवकर संपवल्याचा आरोप केला आहे. हा वाद मागील अनेक काळापासून चालला आहे. आता त्या प्रकरणाबाबत एक नवी माहिती समोर येत आहे.भारताचे मुख्य संघनिवड अधिकारी संदीप पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की धोनीने कधीही युवराजला संघाबाहेर करण्याचा सल्ला दिला नाही.
संदीप हे सप्टेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१६ या दरम्यान मुख्य संघनिवड अधिकारी होते. युट्युबवरील एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले, “समितीच्या बैठकीवेळी किंवा दौऱ्यावर असताना किंवा सामन्यादरम्यान धोनीने एकदाही युवराज सिंगला संघातून बाहेर काढण्याचा सल्ला दिला नाही. त्याचा निवड समितीवर पूर्ण विश्वास होता आणि त्याने त्यामध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. निवड समितीच ठरवते की कोणाला संघात घ्यायचे आणि कोणाला नाही.”
योगराज यांनी धोनीवर लावलेल्या आरोपांबाबत संदीप म्हणाले, “एक वडिल म्हणून योगराज सिंग यांनी आपल्या मुलासाठी भावनिक होणे यामध्ये काही चुकीचे नाही, मात्र धोनीला युवराजला संघातून वगळण्यासाठी दोष देणे योग्य नाही.”
योगराज म्हणाले, ” त्यांच्या मुलासोबत जे काही झाले त्यामागे धोनी आहे. त्याने स्व:तचा चेहरा आरशात पाहिला पाहिजे. तो एक उत्तम क्रिकेटपटू आहे, मात्र त्याने जे काही केले यासाठी मी त्याला कधीही माफ करणार नाही. युवराज आणखी चार-पाच वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला असता.”
युवराजने २००७ टी२० विश्वचषक आणि २०११च्या वनडे विश्वचषकात अनेकादा म २०११च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकला होता. त्यावेळी तो कर्करोगाशी झुंज देत होता. उपचारानंतर तो मैदानात परतला. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना २०१२ मध्ये खेळला होता. तसेच २०१७ मध्ये शेवटचे वनडे आणि टी२० सामने खेळले. नंतर जून २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
Comments are closed.