पाकिस्तानी खेळाडू थरथर कापत होते; IND vs PAK लढतीबाबत शाहिद आफ्रिदीचा धक्कादायक गौप्यस्फोट

टीम इंडियाने आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून जेतेपद पटकावले. हिंदुस्थानने सलग दुसऱ्यांदा तर एकूण तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकत विक्रमही केला. हिंदुस्थानच्या या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने 2011 च्या वन डे वर्ल्डकपमधील आजवर कधीही न ऐकलेला किस्सा शेअर केला आहे. मोहलीमध्ये झालेल्या त्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंची कशी भंबेरी उडाली होती आणि ते कसे थरथर कापत होते याचा खुलासा आफ्रिदी याने केला आहे.

हिंदुस्थानला त्यांच्याच मायदेशात हरवण्यासाठी पाकिस्तानी संघ खूप आत्मविश्वासाने मैदानात उतरला होता. विशेषतः फलंदाजीची सुरुवात पाहता पाकिस्तान जिंकेल असे वाटत होते, पण मोहलीच्या प्रेक्षकांनी सामन्याचे पूर्ण चित्रच बदलून टाकले, असे एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना आफ्रिदी म्हणाला.

मला आठवतंय 2011 चा तो उपांत्य फेरीचा सामना. आमची सुरुवात खूप चांगली झाली होती. मोहम्मद हाफीज आणि कामरान अकमल यांनी 90 धावांची भागीदारी केली होती आणि आमची एकही विकेट पडली नव्हती. कर्णधार म्हणून मी खूप निवांत होतो आणि आम्हाला वाटलं की आपण सहज जिंकू. पण पहिली विकेट पडली आणि त्यानंतर मैदानावरील हिंदुस्थानी चाहत्यांनी ज्या प्रकारे टीम इंडियाचा उत्साह वाढवला, ते पाहून पाकिस्तानचे काही फलंदाज अक्षरशः थरथर कापू लागले, अशी कबुली आफ्रिदीने दिली.

हाफीज बाद झाल्यानंतर मी पाहिलं की आमचे खेळाडू प्रत्येक चेंडूवर संघर्ष करत होते. प्रेक्षकांचा आवाज इतका प्रचंड होता की आमचा संघ मोठ्या दडपणाखाली आला. पाकिस्तानी खेळाडू इतके दडपणाखाली आले होते की त्यांची अक्षरशः गाळण उडाली होती, असेही आफ्रिदी यावेळी म्हणाला.

दरम्यान, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी हिंदुस्थानच्या 2026 मधील विजयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. हिंदुस्थान या जेतेपदाचा खरा मानकरी आहे. हिंदुस्थानच्या मजबूत क्रिकेट रचनेमुळे त्यांना हे यश मिळत आहे. त्यांच्याकडे फलंदाज, फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाजांची कमतरता नाही. तिथल्या तरुणांमध्ये खेळाची चांगली समज आहे, असे जावेद मियादाद म्हणाले.

Comments are closed.