युद्धामुळे बळीराजाही चिंतेत! खतपुरवठा खंडित, किमती वाढणार, शेतीवर गंभीर परिणाम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सध्याच्या सुरू असलेल्या युद्धामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा खतटंचाईचे सावट गडद होण्याची भीती वर्तवली जात आहे. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याने होरमूझ मार्ग सामुद्रधुनी जहाज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या वाढत्या तणावाचा थेट परिणाम भारतावर होण्याची शक्यता असून, विशेषतः खतांच्या आयाती समोर मोठे आव्हान उभे टाकले आहे.

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतपुरवठा अत्यावश्यक असल्याने ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे. जागतिक खत व्यापारापैकी सुमारे ३३ टक्के वाहतूक होरमूझ सामुद्रधुनी मार्ग होते. युरिया, डीएपी आणि अमोनिया यासारख्या महत्त्वाच्या घटकांच्या निर्मितीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे या मार्गातील वाहतूक ठप्प झाली असून, भारताच्या आयातीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारताचे खत आयातीवरील अवलंबित्व आधीच मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास सरकारवरील अनुदानाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. तसेच कृषी निविष्ठा पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

इराण आणि ओमान यांच्या दरम्यान असलेला होरमूझ सामुद्रधुनी हा जागतिक व्यापारातील अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग आहे. मध्यपूर्वेतून होणाऱ्या खत निर्मितीचा मोठा हिस्सा येथून जातो. त्यामुळे नायट्रोजन, फॉस्फेट आणि सल्फर यांच्या व्यापारावर ही परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्यःस्थिती पाहता जिल्ह्यामध्ये खतसाठा मुबलक आहे पण येणाऱ्या काळात युद्धजन्य परिस्थिती अशीच असल्यास मात्र खतसाठा पुरवठ्यावर याचा परिणाम जाणवेल, असे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच खते घेऊन जाण्याचे व्यापारी संघटनेतर्फे बोलले जात आहे.

Comments are closed.